जिल्हा परिषदेच्या निधीचे असमान वाटप झाल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी पुकारलेले आंदोलन शनिवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले. पुढील तीन दिवसात या विषयावर उभयतांची बैठक बोलावून तोडगा काढण्यात येणार आहे. त्यावेळी सकारात्मक निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने निधी वाटपात सेना, मनसे व माकपच्या सदस्यांना डावलल्याच्या निषेधार्थ शिवसेनेसह इतर पक्षांच्या सदस्यांनी सर्वसाधारण सभेत ठिय्या दिला होता. सभेचे कामकाज संपुष्टात आल्यानंतर पुढील २४ तास सुरू ठेवलेले आंदोलन शुक्रवारी दुपारी मागे घेण्यात आले. दरम्यानच्या काळात सेनेच्या आवाहनास प्रतिसाद देत भाजप, मनसे व माकपही आंदोलनात सहभागी झाले. असमान निधी वाटपाच्या मुद्यावरून सत्ताधारी दाद देत नसल्याचे लक्षात घेऊन विरोधकांनी शनिवारी सकाळी पुन्हा जिल्हा परिषदेत धडक मारली. प्रवेशद्वारासमोर ठिय्या देऊन सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (ग्रामीण) जयंत दिंडे, माजी उपमहापौर अजय बोरस्ते, भाजपचे खास हरिश्चंद्र चव्हाण व माकपचे नेतेही यावेळी उपस्थित होते. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी रणजितकुमार यांची भेट घेऊन चर्चा केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा