केंद्र सरकारने सर्वसामान्यांवर लादलेल्या नोटबंदीच्या निर्णयामुळे शेतकरी, कामगार व सर्वसामान्य जनतेला होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागले. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. परंतु जिल्ह्यात पक्षाची परिस्थिती कमालीची खालवल्याने आंदोलनास कार्यकर्त्यांची संख्या कमी होती.

यावेळी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यामध्ये देशाच्या अर्थ व्यवस्थेतील काळा पैसा नष्ट करण्याच्या हेतुने पंतप्रधानांनी ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी काळापैसा नष्ट होत असल्याने सुरवातीला पक्षाने त्याचे स्वागत केले. परंतु हा निर्णय घेण्याआधी व त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्याबाबत सरकारने कुठलेही ठोस नियोजन न केल्याने सर्वसामन्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. कृषी, कष्टकरी व असंघटीत कामगारांना विविध अडचणींचा सामोरे जावे लागत आहे.

शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या हंगामातील पेरण्यासाठी बी-बियाणे, खते व औषधे मिळणे रोख रक्कम जवळ नसल्याने अवघड झाले आहे. शेतमालाचे भाव कोसळले असून टोमॅटो, कांदा व इतर पीके कमी भावाने विकली जात असल्याने रोखीचे व्यवहार ठप्प झाले. सहकारी बँका तसेच पतसंस्थांवर घातलेल्या निर्बंधामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्वाचा भाग असलेला शेतकरी वर्ग अडचणीत आला असून सर्वसामान्य नागरिकांना बँकेतील स्वतःचे पैसे काढणे देखील कठीण झाले आहे.

व्यापारी वर्गाला याचा सर्वात मोठा फटका बसला असून त्यांचे खेळते भांडवल बंद झाल्याने संपूर्ण अर्थव्यवस्थेवर याचे गंभीर परिणाम झाले आहे. या परिस्थितीमुळे १०० पेक्षा अधिक लोक देशभरात मृत्यूमुखी पडले असून. देशात आणिबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी यासाठी केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात आदी मागण्या पक्षाच्या वतीने करण्यात आल्या.

यावेळी आ. जयंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नाना महाले उपस्थित होते. दरम्यान, पक्षाच्या वतीने सोमवारी करण्यात येणारे आंदोलन केवळ औपचारिकता ठरले. पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या या राज्यव्यापी आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते आ. छगन भुजबळ, समीर भुजबळ, देविदास पिंगळे, छबू नागरे यांच्या विविध गैरप्रकरणांमुळे जिल्ह्यात पक्षाची प्रतिमा खालावल्यामुळे आंदोलनात कार्यकर्त्यांची संख्या कमी होती.

Story img Loader