चिपळूण : नाशिकच्या हवेत खैर तस्करी प्रकरणाचे धागेदाेरे थेट चिपळूणपर्यंत पाेहाेचल्याने मंगळवारी नाशिकच्या वन विभागाने तालुक्यातील तीन कातभट्ट्यांवर छापा टाकला. यातील एका कंपनीतून तब्बल ८० लाखाचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या छाप्यात सावर्डेतील कातभट्टी फॅक्टरीला सील ठाेकले असून, फॅक्टरींच्या मालकाला नाेटीस बजावली आहे. 

नाशिक मधून अन्य कोण कोणत्या फॅक्टरीमध्ये खैराची तस्करी झाली आहे, याचा नाशिक वनविभागाकडून शोध सुरू आहे. जिल्ह्यातील काही कात फॅक्टरी त्यांच्या रडारवर आहेत.  याबाबत नाशिकचे विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांनी माहिती देताना सांगितले की, खैर तस्करीप्रकरणी नाशिक वन विभागाने चाैघांना अटक केली आहे. त्यातील दाेघे उत्तर प्रदेशमधील तर उर्वरित दाेघे गुजरातचे आहेत. या चौघांनी नाशिक मधून खैराची तस्करी करून ती चिपळूण मधल्या काही कात फॅक्टरींना विकल्याचे समोर आले आहे. त्यानंतर अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक ऋषिकेश रंजन  व मुख्य वनसंरक्षक रामानुजन कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणची माहिती घेऊन आम्ही चिपळूणला आलो. मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी स्थानिक पातळीवर सहकार्य केले. वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश गवारी, वनपरिक्षेत्र अधिकारी सविता पाटील वनपाल दुसाने, सूर्यवंशी, गायकवाड व इतर वनाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने सावर्डे-कुंभारवाडी येथील सिंडिकेट फूड्स फॅक्टरीवर धाड टाकली. या धाडीत मोठ्या प्रमाणात अवैध खैरसाठा आढळला. या कारवाईदरम्यान फॅक्टरीचे मालक विक्रांत तेटांबे तिथून पळून गेल्याचे लक्षात आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना समन्स बजावला आहे. या फॅक्टरीमधील कागदपत्रे व पुस्तके, वाहतूक पासेस, टॅबलेट पुढील चौकशीसाठी जप्त केले आहे. या फॅक्टरीमध्ये मोठ्या प्रमाणात कात ज्यूस व रेडिमेड कात आढळला आहे. हा कात नाशिकच्या जंगलातील खैर लाकडापासून बनवल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने फॅक्टरीला सील ठोकण्यात आले आहे. या कंपनीतून एकूण ८० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा : Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला! “मी नाराज होऊन रडणारा नाही, तर मी लढणारा..”

ज्या कात फॅक्टरीमध्ये नाशिकहून आणलेला अवैध खैर वापरण्यात आला आहे. अशा तीन कंपन्यांचा शोध आम्हाला लागला आहे. जिल्ह्यातील अन्य काही फॅक्टरीमध्ये नाशिकहून आणलेला खैराचा साठा वापरण्यात आला आहे का याची चौकशी आम्ही करत आहोत. ज्या कंपन्या सहकार्य करतात त्याची माहिती वरिष्ठांना देत आहोत. ज्या सहकार्य करत नाहीत त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. सावर्डे परिसरातील दोन फॅक्टरी मालकांना आम्ही नोटीस काढली आहे. ते चौकशीसाठी हजर राहिले नाही तर त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल.

विशाल माळी, विभागीय वन अधिकारी नाशिक