मोहनीराज लहाडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नगर : नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे हे पुन्हा रिंगणात असून, भाजपने उमेदवाराचे नाव अद्याप जाहीर केलेले नाही. मतदार नोंदणीपासून काँग्रेसने सारे योग्य नियोजन करीत हा मतदारसंघ कायम राखण्याकरिता यंत्रणा राबविला आहे. दुसरीकडे भाजपमधील उमेदवारीचा घोळ अद्याप संपलेला नाही.

नाशिक पदवीधरचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. महाविकास आघाडीनेही त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र त्यांचा प्रतिस्पर्धी उमेदवार कोण, हे निवडणूक जाहीर झाली तरी अद्याप भाजपकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. वंचित बहुजन आघाडीने निवृत्त सनदी अधिकारी रतन बनसोडे (येवला, नाशिक) यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

आणखी वाचा – सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्याबाबत बावनकुळेंचे सूचक वक्तव्य, म्हणाले “आम्ही संन्याशी…”

भाजपकडून डॉ. राजेंद्र विखे (नगर) धनराज विसपुते (धुळे), हेमंत धात्रक (नाशिक) इच्छुक आहेत. राजेंद्र विखे हे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू आहेत. नाशिक, नगर, जळगाव, धुळे व नंदुरबार अशा पाच जिल्ह्यांचा या मतदारसंघात समावेश होतो. त्यामुळे पक्षाशिवाय उमेदवाराला स्वत:ची अशी भक्कम, व्यापक यंत्रणा हवी असते. त्यादृष्टीने विखे यांच्या उमेदवारीकडे पाहिले जाते. मात्र एकाच कुटुंबात आणखी संधी भाजपकडून दिली जाईल का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसे झाल्यास आजीमाजी महसूलमंत्र्यांत लढत रंगू शकते. डॉ. तांबे हे माजी महसूलमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघ हा एकेकाळी भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु या मतदारसंघाकडे भाजपने दुर्लक्ष केल्याचे दिसते. त्यातूनच आता या मतदारसंघावर काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. सन २००९ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीतून काँग्रेसचे डॉ. तांबे यांनी या मतदारसंघात प्रवेश केला आणि गेल्या तीन निवडणुकांतून विजय मिळवला. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने राज्य व केंद्रात सत्ता असूनही मतदारसंघ गमावला. पक्षातीलच अनेक ठिकाणचा बेबनाव त्याला कारणीभूत ठरला. विशेषत: एकनाथ खडसे- गिरीश महाजन यांच्यातील वाद विकोपाला गेले होते आणि शिवसेनेने अखेरच्या टप्प्यात विरोधात भूमिका घेतली होती. आताही भाजपने मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीकडे फारसे लक्ष दिलेले दिसत नाही.

आणखी वाचा – उमेदवारी अर्जाच्या गोंधळाची राज्यात जुनीच परंपरा

विभागातील पाचही जिल्ह्यांत सर्वाधिक नोंदणी नगर जिल्ह्यातून झाली आहे. गेल्या वेळी ती नाशिक जिल्ह्यातून झाली होती. नगर जिल्ह्यातूनही सर्वाधिक नोंदणी थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघातून झाली आहे. सध्या राज्य पातळीवर वंचित बहुजन आघाडी व शिवसेना यांच्यामध्ये युतीचे राजकारण शिजत आहे. त्यातून वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होणार का याबद्दलची चर्चा सुरू आहे. असे असतानाही काँग्रेसच्या, महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने पदवीधर मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली आहे.