पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ तर या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आला आहे. या जागेवर भाजपा तसेच महाविकास आघाडी नेमका कोणाला पाठिंबा देणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पक्षाचा एबी फॉर्म मिळालेला असूनही सुधीर तांबे यांनी आपला उमदेवारी उर्ज न भरल्यामुळे त्यांना काँग्रेसने निलंबित केले आहे. या निलंबनानंतर सुधीर तांबे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मी लहानपणापासून काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, असे ते म्हणाले आहेत. तांबे यांच्या याच विधानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.
“सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेसच्या हायकमांडने कारवाई केलेली आहे. त्यामुळे या कारवाईबाबत काय बोलावे हा त्यांचा प्रश्न आहे,” अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
आमचा पाचही जागांवर विजय होणार
त्यांनी नाशिकमध्ये कोणत्या उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा असेल, हे लवकरच स्पष्ट होईल, असे सांगितले. तसेच सर्व पाच जागांवर आमचा विजय होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. “नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असणार यावर एकमत होईल. या मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीचे एकमत आहे. पाचही शिक्षक-पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचा मोठा विजय होईल. त्यासाठी आम्ही रणनीती आखली आहे,” असे नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा >> Urfi Javed Dress : उर्फी जावेद वादावर शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मी…”
डॉ. सुधीर तांबे यांचे निलंबन
पक्षविरोधी भूमिका घेऊन शिस्त मोडल्याने सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच सोनिया गांधी यांच्या मान्यतेने शिस्तपाल समितीने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात चौकशी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा >>Nashik Graduate Constituency Election : सत्यजित तांबेंना निलंबित करण्याची सूचना; राजकीय घडामोडींना वेग!
दरम्यान, सुधीर तांबे यांनी या निलंबनावर नाराजी व्यक्त केली आहे. मी लहानपणापासून काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. मला कारवाईबाबत समजलं. मात्र, या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत मला काहीही बोलायचं नाही,” अशी प्रतिक्रिया सुधीर तांबे यांनी दिली.