नाशिकच्या काळाराम मंदिरात काही आक्षेपार्ह पत्रकं वाटण्यात आली होती. काळाराम मंदिर आणि परिसरात काही विशिष्ट समाजातील लोकांना प्रवेश वर्ज्य असल्याचं यामध्ये म्हटलं होतं. ज्यावरुन मोठा गदारोळ झाला. या प्रकरणानंतर शनिवारी (२२ जून) चार तास पंचवटी भागात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ही पत्रकं प्रसिद्ध करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“पोलिसांनी या प्रकरणाची उकल केली आहे. काळाराम मंदिराच्या आसपास राहणाऱ्या लोकांना धमकीचं पत्र प्रसिद्ध करण्यात आलं होतं. ते प्रसिद्ध करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. त्यातून हे लक्षात आलं की दुसऱ्या व्यक्तीशी असलेलं वैमनस्य काढण्यासाठी त्याने तशाप्रकारचं पत्र ज्यात दलित समाजाला धमकी दिली आहे, निळे झेंडे लावू नका वगैरे उल्लेख आहे. ज्याने पत्र तो देखील अनुसूचीत जाती प्रवर्गातलाच आहे. त्याने कुठल्यातरी वेगळ्या हेतूने काढलेलं ते पत्र आहे. आरोपीकडे पोलिसांना चार मोबाईल आणि दोन लॅपटॉप मिळाले आहेत. अन्य कुणी या ठिकाणी त्याच्या मागे आहे का? दंगल घडवून आणण्याच्या उद्देशाने हे पत्र काढण्यात आलं आहे का? ज्याच्या नावाने पत्र काढले, त्याच्याशी त्याचे काय वैर होते. त्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी त्याने पत्र काढले आहे का? या सर्व प्रश्नांची चौकशी नाशिक पोलीस करत आहे. हे पत्र काढून पत्र सोशल मीडियावर टाकायचे आणि लोकांमध्ये गैरसमजुती निर्माण करून दंगा घडवण्याचे प्रयत्न यापुढेही होऊ शकतात. त्याकडे पूर्ण लक्ष ठेवून आम्ही आहोत.”

“टीका करणारे…”, अमृता फडणवीसांचं उद्धव ठाकरेंच्या ‘वाजवले की बारा’ टीकेवर सूचक विधान; म्हणाल्या, “सत्ताधारी किंवा विरोधकांना…”

राजकीय नेत्यांनी भान बाळगलं पाहिजे

काही राजकीय नेत्यांनी हे पत्र ट्विट केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्याकडून हा प्रकार झाला. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकारात शहानिशा न करता वस्तुस्थिती न तपासता तसे पत्र व्हायरल केल्यास समाजात तेढ निर्माण होईल. यामुळे राजकीय नेत्यांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखली पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

नाशिकमधल्या काळाराम मंदिर परिसरात काही पत्रकं वाटण्यात आली होती. ज्यात विशिष्ट समाजाला धमकी देण्यात आली होती. सध्या तरी ही घटना पूर्व वैमनस्यातून घडल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. अशात आता या प्रकरणी आरोपीकडून काय काय माहिती मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.