एकविसाव्या शतकाली दुसऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे मंगळवारी पहाटे नाशिक येथील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त स्थानी ध्वजारोहण करण्यात आले. साधू, महंत आणि भाविकांच्या अपूर्व उत्साहाने रंगलेल्या या अपूर्व सोहळ्याचे  त्र्यंबकेश्वर येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग तर नाशिक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे साक्षीदार झाले.
पुरोहित संघांच्या वतीने रामकुंडावरील ध्वजारोहण सोहळ्यास नरेंद्र महाराज, जगद्गुरु हंसदेवाचार्य, महंत ग्यानदास महाराज, तिन्ही अनी आखाडय़ांचे प्रमुख आदी धर्मगुरूंसह विविध मंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी ध्वजारोहणानंतर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. हा अद्भूत सोहळा डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी हजारो भाविकांनी रामकुंड आणि कुशावर्त स्थळी ठाण मांडले होते. प्रशासनाच्या वतीनेही भाविकांना सोहळ्याचे व्यवस्थित दर्शन व्हावे यासाठी ठिकठिकाणी ‘स्क्रिन’लावले होते. रामकुंडावर पहाटे सहा वाजून १५ मिनिटांनी मुख्यमंत्र्यांसह साधू, महंतांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण होताच भाविकांनी एकच जयघोष केला. सिंहस्थाच्या पहिल्याच दिवशी रामकुंडात स्नान करण्यासाठी एकच गर्दी झाली.
त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबक राजाच्या पूजनानंतर ताम्रपटातील ध्वज पताकेचे पूजन करण्यात आले. यावेळी पंचनाम दशनाम जुना आखाडय़ाचे आचार्य महामंडलेश्वर अध्वेशानंद महाराज यांच्यासह राजनाथ सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती. ताम्रपटातील ध्वज पताका स्तंभावर चढविण्यासाठी अर्धा तासापेक्षा अधिक काळ लागला.