दोन वेळचा पाणीपुरवठा एक वेळ करूनही शासकीय निर्देशानुसार २० टक्क्यांची पाणीकपात होऊ शकत नसल्याने, नाशिककरांनी पाण्याचा जपून वापर करावा, पिण्याच्या पाण्याचा वाहने, ओटे धुण्यासाठी तसेच अंगणात सडा टाकण्यासाठी वापर करू नका, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्र आज पाण्यासाठी तडफडत आहे. नाशिक त्यातल्या त्यात सुदैवी म्हणावे लागेल. जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने धरणांमध्ये पुरेसा साठा झाला होता. तरीही पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी पुरविण्याचे लक्ष असल्याने महापालिकेने २० टक्क्यांपर्यंत पाणी वापरात बचत करावी, अशा शासकीय स्तरावरून सूचना देण्यात आल्या. त्यानुसार महानगरपालिकेने काही प्रमाणात पाणीबचत सुरू करण्यासाठी दररोज एक वेळ पाणीपुरवठा सुरू केला आहे. त्याद्वारे अद्याप २० टक्के पाणीकपात होऊ शकलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा, पाणी आल्यानंतर आदल्या दिवसाचे पाणी शिळे म्हणून फेकून देऊ नये, पिण्याच्या पाण्याचा उपयोग करून वाहने, गाडय़ा, बंगले, अंगण, ओटे धुऊ नयेत, अंगणात सडा टाकू नये, तसेच झाडे व लॉनकरिता शक्यतो वापरलेले पाणी देण्याची व्यवस्था करावी, कूपनलिका असेल तरी त्याचा अर्निबध वापर करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या पाइपलाइनची, व्हॉल्व्हची, जलकुंभाची गळती होत असल्यास त्याची सूचना मनपाच्या १४५ या दूरध्वनी क्रमांकावर कळवावी, त्याची त्वरित दखल घेतली जाईल. रविवारी रंगपंचमीनिमित्त बऱ्याच संस्था व मंडळांकडून पाण्याच्या टँकरची, साठवण टाक्यांची मागणी महानगरपालिकेकडे केली जाते. या वर्षांची स्थिती विचारात घेता नागरिकांनी कोरडी रंगपंचमी साजरी करावी, पाण्याचा वापर करू नये, अशी सूचनाही पालिकेने केली आहे. पाण्याची मागणी आली तरी महानगरपालिकेतर्फे टँकर दिला जाणार नाही, असेही आयुक्त संजय खंदारे व महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांनी स्पष्ट केले आहे.

Story img Loader