दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर पिंपळगाव बसवंत येथील मेळाव्यात शेतकऱ्यांची कणव घेऊन सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाशिक येथे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या मिरवणुकीत चक्क नोटांची उधळण केल्याचा प्रकार घडला. विशेष म्हणजे हा प्रकार सुरू असताना जवळच राष्ट्रवादीच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंसह ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हेही उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष तटकरे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि भुजबळ यांच्या उपस्थितीत मंगळवारी पिंपळगाव बसवंत येथे शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात सर्वानी दुष्काळाची दाहकता मांडत भाजपवर टिकास्त्र सोडले . त्यानंतर नाशिक येथे राष्ट्रवादी कार्यालयात पत्रकार परिषदेत या नेत्यांनी दुष्काळाबाबत राज्य शासन गंभीर नसल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी दौरा करण्याऐवजी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. यावेळी पक्षाच्या नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रही देण्यात आले. युवक शहराध्यक्षपदी निवड झालेले अंबादास खैरै आणि शहर कार्याध्यक्षपदी निवड झालेले छबू नागरे हे दोघे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक आहेत. या दोघांसह इतरांच्या निवडीचा आनंद कार्यकर्त्यांनी ढोल-ताशे वाजवित आणि नोटा उधळून साजरा केला. मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाच्या नेते दुष्काळावर बोलून थांबत नाही तोच कार्यालयासमोरील रस्त्यावर त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून हा असा आनंदोत्सव सुरू होता. मिरवणुकीत नोटा उधळल्या जात असल्याचे पाहून ये-जा करणारे सर्वच चकित होत होते. दरम्यान, सत्ताधारी भाजप-सेना औरंगाबादच्या नामांतराचा विषय पुढे करून सर्वसामान्यांचे लक्ष विचलित करीत असल्याचा आरोप तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. राज्यासमोर दुष्काळ आणि कुंभमेळ्यातील पहिल्या पर्वणीचे फसलेले नियोजन असे अनेक गंभीर प्रश्न असून ते सोडविण्याकडे शासनाने प्राधान्यक्रमाने लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. कुंभमेळ्यातील पहिल्या शाही पर्वणीत आठकाठी करून भाविकांना रोखण्यात आले. वास्तविक, या निमित्ताने नाशिकचे पर्यटनस्थळ म्हणून ‘ब्रँडिंग’ करण्याची संधी होती. तथापि, प्रशासन व पोलिसांच्या कार्यशैलीमुळे ती गमावली गेली. सिंहस्थाच्या शिखर समितीचे मुख्यमंत्री अध्यक्ष असून त्यांना ही जबाबदारी टाळता येणार नाही, असे भुजबळ यांनी सांगितले. संपूर्ण नाशिकला लोखंडी जाळ्यांद्वारे कारागृहाचे स्वरुप देणारे जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांची चौकशी करावी, पुढील पर्वणीच्या नियोजनासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
नाशिकला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून नोटांची उधळण
दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर पिंपळगाव बसवंत येथील मेळाव्यात शेतकऱ्यांची कणव घेऊन सत्ताधाऱ्यांवर टिकास्त्र सोडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाशिक येथे ...

First published on: 02-09-2015 at 01:33 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik ncp workers throw money in procession