मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अडचणीत आलेल्या नारायण राणे यांच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू झालेली आहे, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी दिली आहे. नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असून गुन्ह्याचं गांभीर्य पाहून याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राणेंना अटक करण्यासाठी पथक पाठवण्यात आलं आहे. राणेंच्या अटकेदरम्यान त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदाचा आदर राखून तसंच हक्कभंग होणार नाही याची दक्षता घेऊन कारवाई करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याच्या नारायण राणेंच्या वक्तव्यामुळे आता राज्यात चांगलीच खळबळ माजली आहे. शिवसैनिक संतापले असून राणेंवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. संतापलेल्या शिवसैनिकांनी अनेक ठिकाणी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असून नाशिकमध्ये भाजपा कार्यालयाची शिवसेनेकडून तोडफोड करण्यात आली आहे. तर जुहूमध्येही शिवसैनिकांचं जोरदार आंदोलन सुरू आहे. नारायण राणेंच्या या वक्तव्यामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. राज्यात तीन ठिकाणी राणेंवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

दरम्यान, नाशिक पोलिसांचं एक पथक चिपळूणला रवाना झालं आहे. नारायण राणेंना अटक करुन कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश आहेत. दरम्यान चिपळूणमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून नारायण राणेंकडून अटक टाळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पुणे पोलिसांचं पथकही राणेंच्या अटकेसाठी रवाना झालेलं आहे.

हेही वाचा – शिवसेनेकडून नाशिकमधील भाजपा कार्यालयाची तोडफोड; दगडफेक करत काचा फोडल्या

तर अटकेच्या वृत्तावरुन नारायण राणे चांगलेच संतापले आहेत. माझ्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलं असून मी काय साधा माणूस वाटलो का अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही, तुम्ही तपासून पहा असंही यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कानाखाली लगावण्यासंबंधी केलेल्या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला असून चिपळूणमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Story img Loader