Nashik Satpir Dargah Police Commissioner Sandeep Karnik : नाशिकमधील काठे गल्ली परिसरातील सातपीर दर्गा मंगळवारी (१५ एप्रिल) रात्री महापालिका आणि पोलिसांनी हटवला. या कारवाईदरम्यान, काठे गल्लीत मोठा तणाव निर्माण झाला होता. शेकडो लोकांचा जमाव यावेळी जमला आणि त्यांनी पोलीस व महापालिका कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. ही हिंसा रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच त्यांना जमाव पांगवण्यासाठी लाठीहल्ला देखील करावा लागला. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत २५ जणांना ताब्यात घेतलं आहे.

दरम्यान, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी त्यांनी सांगितलं की “काल अनेक गंभीर कलमांखाली काही गुन्हेगारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये लोकांची माथी भडकावणे, आक्षेपार्ह माहिती प्रसारित करणे, खुनाचा प्रयत्न करणे अशा अनेक कलमांचा समावेश आहे. काल जेव्हा हिंसक आंदोलन चालू होतं तेव्हा त्याच ठिकाणावरून आम्ही १५ आरोपींना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर रात्री आणखी १० आरोपींना ताब्यात घेतलं. जे लोक दंगा करत होते.

नाशिकचे पोलीस आयुक्त काय म्हणाले?

संदीप कर्णिक म्हणाले, आम्ही ज्यांना ताब्यात घेतलं आहे त्यांच्यापैकी अनेकांना आमच्या अधिकाऱ्यांनी, अंमलदारांनी ओळखलं होतं. त्यांची नावे एफआयआरमध्ये नोंदवण्यात आली आहेत. तसेच काहीजण दुचाकीवरून तिथे आले होते. दगडफेक करून ते तिथून पळून गेले. मात्र त्यांच्या दुचाकी तिथेच राहिल्या. आम्ही त्या दुचाकी ताब्यात घेतल्या असून त्या दुचाकी कोणाच्या होत्या, त्या दुचाकीवरून घटनास्थळी कोण आलं होतं याचा तपास करत आहोत.

चौकशीतून आणखी आरोपींची नावे पुढे येतील : पोलीस आयुक्त

या प्रकरणात किती जण संशयित आहेत? असा प्रश्न विचारल्यावर पोलीस आयुक्त म्हणाले, १,४०० ते १,५०० जणांचा जमाव तिथे जमला होता. त्यापैकी ५० ते ५५ जणांना आमच्या पोलिसांनी ओळखलं आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. काल घटनास्थळावरून आम्ही १५ जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी चालू असून त्याद्वारे त्यांच्या इतर साथीदारांची माहिती मिळाली आहे. दरम्यान, काल रात्री आम्ही आणखी १० जणांना ताब्यात घेतलं आहे. आज आम्हाला त्यांची पोलीस कोठडी मिळेल. त्यांच्या चौकशीतून आणखी काही नावं पुढे येतील.

हा पूर्वनियोजित कट होता का? संदीप कर्णिक म्हणाले…

दंगेखोरांनी इतक्या मोठ्या प्रमाणात दगड कुठून आणले? हा पूर्वनियोजित कट होता का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. त्यावर संदीप कर्णिक म्हणाले, “आम्हाला मागील दोन तीन दिवसांपासून पडद्यामागे चाललेल्या कारवायांची माहिती मिळत होती. या दंगेखोरांचा बैठका चालू होत्या. सामान्य माणसांची माथी भडकावण्याचा प्रयत्न केला जात होता. त्यामुळे आम्ही बंदोबस्तासाठी एसआरपीएफच्या तीन तुकड्या मागितल्या होत्या. या तीन तुकड्या नाशकात दाखल झाल्या. त्यामुळेच आम्हाला अधिक बंदोबस्त करता आला. आम्ही अशा कारवाईसाठी सज्ज होतो.