शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नाशिकमधल्या मालेगाव येथे मोठी सभा होणार आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकसंघ ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे राज्यभर सभा घेणार आहेत. त्यापैकी पहिली सभा कोकणातील खेड येथे झाली. तर दुसरी सभा आज मालेगावात होणार आहे. या सभेची एकीकडे जोरदार तयारी सुरू असताना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण नाशिकमधील महिला पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बंदरविकास मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आज ठाणे येथे ठाकरे गटातील महिला पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी १५ ते २० महिला पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. ठाकरे गट सोडून शिंदे गटात जाण्यामागचं कारण विचारलं असता या महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, “नाशिकमधील ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांना बोलण्याची पद्धत नाही. तिथे सभेत स्टेजवर महिलांच्या लाली-लिपस्टिकचा विषय काढला जातो. तुमचे हात वर असतील तर तंगड्या माझ्याकडे आहेत, अशा भाषेत कोणी बोलत असेल, कोणी आमच्या चारित्र्याला धक्का पोहोचवत असेल तर त्यांच्यासोबत काम करणं आम्हाला शक्य नाही.”
हे ही वाचा >> “पवारांची चावी कुठेही चालते”; गुलाबराव पाटलांचा टोला, म्हणाले, “त्यांनी उठोबा-बठोबा..”
“नाशकातल्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेचं ध्येयधोरण माहिती नाही”
शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांसोबत एबीपी माझा या वृत्तवाहिनीने बातचित केली. तेव्हा या पदाधिकारी म्हणाल्या की, “आधीच्या शिवसेनेत महिला आघाडीला मान-सन्मान होता, महिलांचा आदर केला जात होता, महिलांना निर्णयप्रक्रियेत विचारात घेतलं जात होतं. परंतु आता तिथे जे पदाधिकारी बसले आहेत ते मूळचे शिवसैनिक नाहीत. असंच कोणालाही आणून तिथे बसवलं आहे. त्यांना शिवसेनेचं ध्येयधोरण माहिती नाही. आम्ही सर्वजण कडवट शिवसैनिक आहोत. परंतु जुन्या शिवसैनिकांसोबत चुकीचा व्यवहार होत असल्याने आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.”