पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रासाठी शिवनई येथील जागा तातडीने हस्तांतरित करण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही जिल्ह्य़ाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
विद्यार्थी कृषी समितीच्या वतीने सदर जागा हस्तांतरित करण्याबाबत समितीचे अध्यक्ष आकाश पगार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भुजबळ यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. या उपकेंद्रास शासनाची मान्यता नसल्यास जागा हस्तांतरित करता येणार नाही, असे जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी स्पष्ट केले होते. त्यावर आक्षेप घेत समितीने नाशिकप्रमाणेच पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्रालाही शासनाची मान्यता नाही. तरीही तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी उपकेंद्रासाठी ९६ एकर जागा हस्तांतरित केली असल्याचे लक्षात आणून दिले. हाच निकष नाशिकला का लागू होत नाही, असा प्रश्नही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे. या वेळी पगार यांसह दीपक वाघ, सागर बाविस्कर, केदार कुरकुरे, कैलास मोरे आदी उपस्थित होते.

Story img Loader