Nashik Satpeer Dargah Updates नाशिक येथील काठे गल्ली भागात अनधिकृत धार्मिक स्थळाचं बांधकाम काढण्यासाठी महापालिका आणि पोलिसांनी तयारी सुरु केली. त्यानंतर रात्री तणाव निर्माण झाला होता. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या प्रकरणात सुमारे २० जणांना ताब्यात घेण्यात आलं. ही घटना नेमकी कशी सुरु झाली तो घटनाक्रम पोलिसांनी सांगितला आहे.
नाशिकच्या पोलीस उपायुक्तांनी माध्यमांना काय सांगितलं?
नाशिकचे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना या संदर्भात माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, “दर्ग्याचे ट्र्स्टी आणि प्रतिष्ठित नागरिकांनी बांधकाम हटवण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री ११ वाजता हे सगळे जमले होते. त्याचवेळी उस्मानिया चौकाच्या बाजूने जमाव आला आणि गोंधळ सुरु झाला. दर्ग्याचे विश्वस्त आणि प्रतिष्ठित नागरिकांनी जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही जमावातील लोकांना समजावले. मात्र, त्यांनी कोणाचेही न ऐकता दगडफेक सुरु केली. त्यामुळे पोलिसांनी अश्रुधूर आणि सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवलं. याप्रकरणी आतापर्यंत १५ जणांना अटक करण्यात आली. जमावाच्या दगडफेकीत ३१ पोलिसांना किरकोळ दुखापत झाली आहे. जमावातील संशयित हल्लेखोरांच्या ५७ बाईक्स पोलिसांच्या हाती लागल्या आहेत”, अशी माहिती किरण कुमार चव्हाण यांनी दिली.
पहाटे साडेपाचच्या सुमारास तोडकाम
दगडफेकीच्या प्रकारानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून पहाटे साडेपाच वाजता सातपीर दर्ग्याच्या तोडकामाला प्रारंभ करण्यात आला. दोन जेसीबींच्या सहाय्याने दर्ग्याच्या भिंती आणि अन्य बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं. आतापर्यंत अनधिकृत दर्ग्याचे ९० टक्के बांधकाम पाडण्यात आलं आहे. या पाडण्यात आलेल्या बांधकामाचा ढिगारा पालिकेकडून वेगाने हटवला जात आहे. अतिक्रमणाचा ढिगारा आणि इतर साहित्य महापालिकेच्या वाहनांतून आता बाहेर काढण्यात आलं. अशी माहिती किरण कुमार चव्हाण यांनी दिली.
काठेगल्ली भागात पोलिसांचा फौजफाटा
किरण कुमार चव्हाण यांनी सांगितल्यानुसार, सध्या नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून याठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. या पार्श्वभूमीवर काठे गल्ली ते भाभा नगरच्या दिशेने जाणारी वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिकेने १५ दिवसांत सातपीर दर्ग्याचे अनधिकृत बांधकाम हटवण्याची नोटीस दिली होती. मात्र, हे बांधकाम हटवण्यात न आल्याने पालिकेकडून ही कारवाई करण्यात आली.
देवयांनी फरांदे यांनी काय म्हटलं होतं?
काठे गल्ली सिग्नलकडून नागजी चौक, मुंबई नाक्याकडे जाणाऱ्या मार्गावर हे धार्मिक स्थळ आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात महानगरपालिकेने धार्मिक स्थळासभोवतालच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई केली होती. तेव्हा संपूर्ण अतिक्रमण काढण्यात आले नाही, अशी तक्रार करीत उर्वरित अतिक्रमणही हटविण्याचा आग्रह भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी धरला होता.