जिल्ह्यातील येवला तालुक्यास शुक्रवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या गारांच्या बेमोसमी पावसाने चांगलेच झोडपून काढले. रणरणत्या उन्हात अकस्मात १० ते १५ मिनिटे हा पाऊस कोसळल्याने सर्वत्र गारांचा खच पडल्याचे पहावयास मिळाले. येवला लगतच्या मनमाड तालुक्यातही पावसाने हजेरी लावली.
येवला व मनमाड परिसरात प्रचंड उकाडा जाणवत असताना शुक्रवारी सकाळपासून वातावरणात अचानक बदल होऊन दुपारी हवामान ढगाळ झाले. मनमाड व येवला शहरात वादळी वारा आणि ढगांच्या गडगडाटाला सुरूवात झाली. काही वेळातच पाऊसही सुरू झाल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. येवला परिसरात गारांचे प्रमाण अधिक असले तरी मनमाडमध्ये ते कमी होते. येवल्यात अवघ्या काही मिनिटांत सर्वत्र गारांचा सडा पडल्याचे दिसू लागले. यामुळे नागरिकांनाही सुखद धक्का बसला असताना बच्चे कंपनी लगेच त्या वेचण्यासही सरसावली.
या पावसाने शेतकऱ्यांची धावपळ उडवून दिली. असा बेमोसमी पाऊस येईल, याची कोणाला कल्पनाही नव्हती. अचानक आलेल्या पावसामुळे खळ्यात उघडय़ावर पडलेला कांदा झाकण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. त्यात जे या पद्धतीने उपाययोजना करू शकले नाहीत, त्यांच्या कांद्याचे नुकसान झाले. गारांसह झालेल्या बेमोसमी पावसाचा फटका आंबा पिकालाही बसणार आहे.
गारांमुळे काही झाडांच्या कैऱ्या गळून पडल्याचे सांगण्यात आले. या पावसाने वातावरणातही काहीसा थंडावा निर्माण केला. तापमानाचा पारा ४० अंशापर्यंत जाण्याच्या मार्गावर असतानाच अचानक आलेल्या या पावसामुळे त्रासलेल्या नागरिकांना सुखद दिलासा मिळाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा