अखिल भारतीय द्राक्ष प्रक्रिया मंडळ आणि अखिल भारतीय वाइन उत्पादक संघटना यांच्या वतीने येथे आयोजित दोन दिवसीय ‘इंडिया हार्वेस्ट २०१३’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाइन महोत्सवास उद्योग क्षेत्रातील मान्यवर आणि उच्चभ्रूंकडून मिळालेला प्रतिसाद पाहता नाशिकची वाइन पर्यटन उद्योग नगरी म्हणून वाटचाल सुरू झाल्याचे अधोरेखित होत आहे.
महोत्सवाचा रविवारी समारोप झाला. हॉटेल ज्युपिटर येथे झालेल्या या महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक ही वाइन पर्यटन उद्योग नगरी म्हणून विकसित होण्याची गरज व्यक्त केली होती. एकूण २२ विविध कंपन्यांनी सहभाग घेतलेल्या या महोत्सवास दोन दिवसांत हजारोंच्या संख्येने वाइनप्रेमींनी हजेरी लावली. त्यात उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांचाही सहभाग होता. भारतातील एकूण वाइन उत्पादनापैकी ७० टक्के महाराष्ट्रात तर त्यापैकी ४० टक्के नाशिक जिल्ह्य़ात होते. शेतीला पूरक असा हा उद्योग असल्याने अखिल भारतीय द्राक्ष प्रक्रिया मंडळाचे अध्यक्ष जगदीश होळकर आणि अखिल भारतीय वाइन उत्पादक संघटनेचे अध्यक्ष शिवाजी आहेर यांच्या पुढाकाराने नाशिक येथे झालेल्या या महोत्सवाद्वारे नाशिक जिल्ह्य़ात तयार होणाऱ्या वाइन्सचा दर्जा आणि द्राक्षांचे महत्त्व इतरत्र पोहोचण्यास मदत झाली आहे.
या महोत्सवात विविध जातींच्या द्राक्षांचे दालन, वाइन्सचे स्टॉल आणि त्याच्याशी पूरक अशा गोष्टी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. नाशिक ही धार्मिकदृष्टय़ा पर्यटन नगरी म्हणून आधीपासूनच प्रसिद्ध असली तरी अशा महोत्सवांमुळे तिची ओळख आता वाइन पर्यटन उद्योग नगरी म्हणून होण्यास मदत होऊ शकेल, अशी आयोजकांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा