शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचे वृत्त समजताच शनिवारी नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांतील दुकाने व्यापाऱ्यांनी स्वत:हून बंद केली आणि अवघ्या काही मिनिटात नाशिक, धुळे, जळगाव शहरांमध्ये शुकशुकाट पसरल्याचे पहावयास मिळाले. शिवसैनिकांसह बाळासाहेबांप्रती आस्था असणाऱ्या अनेकांना अश्रू रोखणे अवघड झाले. बहुतांश जणांनी मुंबईकडे प्रस्थान केले. दिवाळीनिमित्त प्रकाशमान झालेले शहर सायंकाळी अंधारात बुडाले.
शिवसेनाप्रमुखांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी सलग दोन दिवसांपासून महाआरती, सामुहिक प्रार्थना याद्वारे साकडे घालणाऱ्या शिवसैनिकांना निधनाचे वृत्त समजल्यानंतर एकच धक्का बसला. स्थानिक प्रमुख पदाधिकारी यापूर्वीच मुंबईला गेले आहेत. यामुळे ठिकठिकाणच्या शिवसैनिकांनी ‘शिवसेनाप्रमुख अमर रहे’च्या घोषणा देत सेना कार्यालय गाठले. काही वेळातच शेकडो शिवसैनिक शालिमार चौकातील कार्यालयाबाहेर जमले. यावेळी अनेकांच्या अश्रुंचा बांध फुटला. बाळासाहेबांच्या जाण्याने पाच दशकांचा झंझावात संपला, अशी भावना ज्येष्ठ शिवसैनिकांनी व्यक्त केली. बाळासाहेबांच्या जाण्याने हिंदु धर्माची मोठी हानी झाली. हे दु:ख शब्दात व्यक्त करता येणार नसल्याची भावना त्यांनी बोलून दाखविली. व्यापारी वर्गाने स्वत: पुढाकार घेत दुकाने बंद केली. शहरातील बहुतांश दुकाने बंद झाल्याने प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट पसरला. पोलीस यंत्रणेने प्रमुख चौका-चौकात बंदोबस्त तैनात करून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली. चित्रपटगृहे, मॉल्सही पूर्णपणे बंद होती. बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनीही आपापल्या घरावरील आकाशकंदील, दीपमाळा बंद ठेऊन श्रद्धांजली अर्पण केली. धुळे, जळगाव व नंदुरबार शहरातील असेच चित्र पहावयास मिळाले. धुळे येथे लोकसंग्राम पक्षातर्फे सायंकाळी आयोजित जाहीर सभा रद्द करण्यात आली. ठिकठिकाणी शिवसैनिकांनी बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करून अंत्ययात्रेसाठी मुंबईला जाण्याची तयारी सुरू केली. जिल्हा कबड्डी संघटनेतर्फे यशवंत व्यायामशाळेत सुरू असलेल्या सराव शिबिरात बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा