जिल्ह्य़ातील दरडवाडी (तालुका केज) येथे उद्यापासून (रविवार) तीन दिवस राष्ट्रीय भारूड महोत्सव होणार आहे. हा महोत्सव देशाच्या सांस्कृतिक पटलावर आणण्याचे काम होत आहे. महोत्सवाच्या रंगमंचावरुन राज्यातील लोककला मांडली जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय नाटय़विद्यालयाचे संचालक प्रा. वामन केंद्रे यांनी दिली.
महोत्सवात ४५ संच सहभागी होणार असून देशभरातील १ हजार कलाकार रंगमंचावर एकत्र येणार आहेत. नागपूर, सोलापूर, कोकणसह दिल्ली येथूनही अनेक कलावंत मंडळी दरडवाडीसारख्या ग्रामीण भागात येऊन कलेचे सादरीकरण करतील. दशावतार हा कोकणातील मराठी अस्मितेचा संच उद्घाटनाचे आकर्षण ठरणार आहे. महोत्सवातून लोककलेवर झोत टाकण्यात येणार आहे. भारूड या लोककला प्रकारास केंद्रस्थानी ठेवून देशातील हा एकमेव महोत्सव होत असल्याचे सांगून रंजन व प्रबोधन याचा सुरेख संगम असलेला हा भारुड लोककलेचा प्रकार पुनरुज्जीवित व्हावा, त्यास उत्तेजन मिळून तरुण मंडळींनीही या कला प्रकाराकडे आकर्षति व्हावे, हा उद्देश असल्याचे प्रा. केंद्रे यांनी सांगितले. डॉ. सतीश साळुंके उपस्थित होते.
लोककलेला पाचपट गर्दी
काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय नाटय़विद्यालयाचा राष्ट्रीय महोत्सव दिल्लीत झाला. या महोत्सवात प्रथमच लोककलेला प्राधान्य देण्यात आले. आधुनिक नाटकापेक्षा लोककलेच्या कार्यक्रमांना पाचपट गर्दी होती, असे सांगून या महोत्सवाचा समारोप तमाशाने झाला हे विशेष, असे प्रा. वामन केंद्रे यांनी सांगितले.

Story img Loader