Flamingo City Navi Mumbai Marathi News पक्षीसंवर्धन आणि त्यांच्या अधिवासाच्या संरक्षणाचे महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी ५ जानेवारी रोजी राष्ट्रीय पक्षी दिवस साजरा केला जातो. पक्ष्यांबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस खास आहे. बॉर्न फ्री यूएसए आणि एव्हियन वेल्फेअर कोलिशनने २००२ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय पक्षी दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. अमेरिकेसह जगभरात पक्षी दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय पक्षी दिन हा वन्य आणि पाळीव पक्षी वाचवण्याची मोहीम म्हणून साजरा केला जातो; जेणेकरून त्यांचे अस्तित्व टिकवून ठेवता येईल. पण याची दुसरी बाजू म्हणजे खरेच आपण पक्ष्यांचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतोय का? बेसुमार वृक्षतोडीमुळे आधीच दुर्मीळ असलेले पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सरलं ते रंगीबेरंगी वळणावळणाचे वर्ष

कोणीतरी म्हटले आहे की, निसर्गाची बाग फुलवायला देवाने पक्षीजगत निर्माण केलं. आपल्या देशात पक्ष्यांच्या साधारण १४०० पेक्षा अधिक जाती आहेत आणि त्या चौफेर विस्तारल्या आहेत. हवामान, उंची, पाऊस, वनसंपत्ती ऐसे पाखरांच्या अधिवासाचे घटक आहेत; ज्याला जे जे मानवते, ते ते ठिकाण तो तो पक्षी आपल्या निवाऱ्यासाठी पसंत करतो. काही पक्षी स्थलांतर करतात. मात्र, येणार्‍या वर्षातही आपल्याला काही दुर्मीळ पक्ष्यांना निरोप द्यावे-घ्यावे लागतील; निसर्गाची साद ऐकावी लागणार आहे. निसर्ग आपल्याला खूप काही सांगू पाहतो आहे. आपल्या हव्यासापोटी माणूस निसर्ग संपवतो आहे आणि त्याचे जीवसृष्टीवर परिणाम दिसत आहेत. असंख्य प्राणी, पक्षी, झाडे, प्रजाती नष्ट होत आहेत. जमिनीचा कस कमी होणं, अनेक आजार होणं हे सगळं निसर्गाशी संबंधित आहे. सध्या पृथ्वीचं तापमान धोक्याची पातळी ओलांडत आहे. अख्खी जैवविविधता नष्ट होत आहे. हे सगळं ठीक करायचं असेल, तर बेसुमार वृक्षतोड, प्लॅस्टिकचा ढीग कमी करायला हवा. निरोगी श्वासासाठी औद्योगिक कारखान्यांनी बंधनं पाळायला हवीत. माणसांना हव्यास कमी करून, कमीत कमी गोष्टींत आयुष्य जगणं शिकावं लागेल. याच पार्श्वभूमीवर आपण ​​न​वी मुंबईत येणाऱ्या परदेशी पाहुण्यांबद्दल बोलूयात.

​​न​वी मुंबईत असलेल्या पाणथळ जागांवर परदेशी पक्षी येत असतात. पक्षीप्रेमी पर्यटकही गर्दी करू लागले आहेत. ऐरोलीमधील जैवविविधता केंद्राच्या वतीने पक्षी पाहण्यासाठी बोटही उपलब्ध करून दिली जात आहे. फ्लेमिंगोच्या जगभरात आढळून येणाऱ्या सहा प्रजातींपैकी दोन प्रजाती ग्रेटर आणि लेसर फ्लेमिंगो भारतात आढळून येतात. त्यात फ्लेमिंगोही मोठ्या संख्येने दरवर्षी न चुकता येथे दाखल होतात आणि फार उशिरापर्यंत ते शहरात थांबलेले पाहायला मिळतात. मात्र, मागील काही वर्षांपासून हे पक्षी ३६५ दिवस नवी मुंबईतच असतात. आधी हे पक्षी फक्त हिवाळ्यात असायचे; मात्र आता या पक्ष्यांनी याच ठिकाणी आपलं बस्तान बसवलं आहे.

फ्लेमिंगो पक्षांचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात अचानक का वाढलं?

पूर्वी या पक्ष्यांची संख्या फार तुरळक प्रमाणात पाहायला मिळत होती; मात्र गेल्या चार ते पाच वर्षांपासून या पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. म्हणूनच नवी मुंबईला ‘फ्लेमिंगो सिटी’ हा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली. वन्य आणि पक्षीप्रेमींच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने ६ ऑगस्ट २०१५ रोजी ठाणे खाडीचा परिसर फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित केला. ठाणे खाडी परिसरात गरुडांसह इतर पक्षी व कीटकांच्या विविध २०० प्रजातींची नोंद झाली आहे. दरम्यान, नवी मुंबई फ्लेंमिंगो सिटी होतेय; पण त्यामागचं भीषण वास्तव तुम्हाला माहितीये का? फ्लेमिंगो पक्ष्यांचं हे प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात अचानक का वाढलं? याचं कारण माहितीये का?

मुंबई फ्लेमिंगोंचे हब होण्याची कारणे

फ्लेमिंगो पक्ष्यांप्रमाणे असे बरेच पक्षी या भागात येतात; मात्र पावसाळा सुरू झाला की, हे पक्षी पुन्हा माघारी फिरतात. पूर्वी फ्लेमिंगोही मागे वळायचे; मात्र मागील दोन वर्षांपासून फ्लेमिंगो ३६५ दिवस इकडेच असतात. मुंबईत फ्लेमिंगो पक्षी अन्नाच्या शोधात येतात. खाडीच्या परिसरात त्यांना चांगलं अन्न मिळतं. फ्लेमिंगो पक्षी निळ्या आणि हिरव्या रंगाची अल्गी; ज्याला सामान्य भाषेत आपण शेवाळं म्हणतो ते खातात. युट्रोफिकेशन प्रक्रियेमुळे मुंबई आणि परिसरात अल्गी वाढल्याचं तज्ज्ञांच मत आहे. मुंबईत खाण्यासाठी चांगलं अन्न मिळत असल्यामुळे मोठ्या संख्येने फ्लेमिंगो आले असावेत, असा कयास व्यक्त केला जात आहे.

प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं

काही पक्षीतज्ज्ञ यामागे सांडपाणी आणि कंपन्यांतून नदीत सोडलं जाणारं पाणीदेखील कारणीभूत आहे, असं मानतात. समुद्रात मानवी विष्ठेचं प्रमाण आता वाढलंय आणि विष्ठेमुळे समुद्रकिनारी जी अलगी तयार होते त्या अलगीचंही प्रमाण वाढलंय. हेच अल्गल ब्लूम या फ्लेमिंगो पक्ष्यांचं मुख्य खाद्य बनल्यानं या खाद्यावर ते पोसले जातात आणि त्याठिकाणी वर्षभर राहतात. याबाबत सविस्तर माहिती देताना ‘पक्षी अभ्यासक नमन काझी’ म्हणतात, “सांडपाणी आणि कंपन्यांतून नदीत सोडलं जाणारं वेस्ट वॉटर यांमुळे अल्गल ब्लूम वाढली आहे. याचा फ्लेमिंगोना फायदा होतोय.” मात्र, जलप्रदूषणाच्या दृष्टीनं हा गंभीर विषय असल्याचं निदर्शनास आलं आहे. मुंबईतील घरांमधून दररोज लाखो लिटर सांडपाणी निघते. ते बहुसंख्य ठिकाणी समुद्र, खाड्या, नाले, नद्यांमध्ये सोडून दिलं जातं. त्यामुळे या जलस्रोतांमध्ये मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण निर्माण झालं आहे. पश्चिम उपनगरात अरबी समुद्र आणि मालाड खाडीत थेट सांडपाणी सोडणारे २७ मोठे नाले, ठाणे खाडीत १२ नाले आणि माहुल खाडी व शहरात नऊ नाल्यांद्वारे समुद्रात सांडपाणी सोडलं जातं. विशेषत: झोपडपट्टी भागातील सांडपाणी थेट नाल्यात किंवा समुद्र, खाड्यांमध्ये सोडलं जातं. त्यामुळे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे.

हेही वाचा >> लग्नाचा बस्ता म्हणजे नेमकं काय? ऐंशी वर्षांची परंपरा अन् काळानुसार बदलेला ट्रेंड; जाणून घ्या इतिहास… 

खारुताईचा हातभार लावू या

नोव्हेंबरपासून ठाणे खाडी परिसरात रुबाबदार आणि दिमाखदार दिसणाऱ्या गुलाबी रंगाच्या रोहित पक्ष्यांचं अर्थात फ्लेमिंगोंचं मोठ्या संख्येनं आगमन होतं. तसे ते सप्टेंबरपासूनच यायला लागतात; परंतु नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या असंख्य थव्यांमुळे खाडीपात्रात आढळणाऱ्या ठिकठिकाणच्या गुलाबी छटा डोळे दिपवून टाकतात. मात्र, अलीकडे या गुलाबी छटा वर्षभर पाहायला मिळतात. अतिप्रमाणात होणारे सिमेंटीकरण अशा अनेक बाबींमुळे पक्ष्यांच्या प्रजातींना धोका निर्माण होत आहे. तसेच जंगलांवरील अतिक्रमणं व वणवे रोखणं यांसाठी प्रयत्न केला पाहिजे. आज राष्ट्रीय पक्षी दिनानिमित्त यासाठी आपण सर्वांनी खारुताईचा हातभार लावायला हवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National bird day 2024 navi mumbais flamingo city identity in danger due to eco destruction know more about flamingo city srk