भारतीय सैन्य दलांसाठी अधिकारी घडवणाऱ्या पुणे येथील राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनीवर बुधवारी केंद्रीय गुन्हे अन्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी (सीबीआय) छापा मारला. एनडीएमध्ये शिक्षकांची निवड आणि नियुक्तीमध्ये घोटाळा झाल्यामुळे ही छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयने एनडीएच्या मुख्याध्यापकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पॉलिटिकल सायन्सचे प्राध्यापक, केमिस्ट्री, गणित विषयाचे सहाय्यक प्राध्यापक यांच्यावर शिक्षक निवडीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप आहे. एनडीएमधील कार्यालये आणि आरोपींच्या निवासस्थानी शोध मोहिम सुरु आहे. एनडीएमधून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलामध्ये सेवा बजावतात.

एनडीए देशातील एक प्रतिष्ठीत सैन्य प्रशिक्षण देणारी संस्था असून अनेकदा विदेशातूनही उमेदवार इथे प्रशिक्षणासाठी येतात. एनडीमध्ये निवड होण्यासाठी विद्यार्थ्यांना खूप परिश्रम करावे लागतात तसेच इथल्या खडतर प्रशिक्षणानंतर उत्तम दर्जाचे लष्करी अधिकारी तयार होतात. एनडीएमधून भारतीय सैन्य दलांमध्ये गेलेल्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक युद्धात महत्वाची भूमिका बजावली आहे.