सोशल नेटवर्किंग साईट्स विषयी विविध प्रकारची चर्चा होत असली तरी या माध्यमाव्दारे सामाजिक बांधिलकीही जपली जाऊ शकते हे फेसबुकचा नियमित वापर करणाऱ्या तरुणांनी दाखवून दिले आहे. पाकिस्तानच्या क्रूर हल्ल्यात शहीद झालेले भारतीय जवान हेमराज सिंग आणि सुधाकर सिंह यांच्या कुटुंबियांना मदतीचे आवाहन करण्यात आल्यानंतर देश- विदेशातील अनेक नेटीझन्सनी प्रतिसाद देत सुमारे एक लाख रुपये जमा करून दिले आहेत.
नेटवर असणाऱ्या तरुणांमध्ये सामाजिक कार्याची आवड निर्माण व्हावी यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गायकवाड तीन वर्षांपासून ‘सोशल नेटवर्किंग फोर सोशल कॉज’ हे अभियान रावबत आहेत. या माध्यमातून हे आवाहन करण्यात आले होते. अभियानातंर्गत आजवर अनेक आधाराश्रम, अनाथालय, वृद्धाश्रम, आदिवासी आश्रमशाळा यांना भरीव स्वरुपातील मदत करण्यात आली आहे.
 सोशल साइट्सवर वेळोवेळी करण्यात आलेल्या आवाहनानुसार अनेक नेटीझन्सनी आता आपल्या वाढदिवसानिमित्त गरजू संस्थांना पुस्तक अथवा गरजेच्या वस्तू भेट देण्यास सुरूवात केली आहे. शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी इराकमधील मिलींद पगारे तसेच अबुधाबी येथील किशोर पवार यांनी प्रत्येकी १० हजार, चीनमधून संदीप गांगुर्डे, ओमानमधून राजेश बक्षी, सिंगापूरहून मुकेश आगाशे यांनी प्रत्येकी पाच हजार रूपयांची मदत पाठवली आहे.  या शिवाय विविध शहरातील अनेक नेटीझन्सनी एक हजार ते तीन हजार रूपयांपर्यंत मदत केली आहे. शहिदांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ही रक्कम जमा करण्यात आली आहे. जमा झालेली मदत शहिदांच्या कुटुंबियांना लवकरच पाठविण्यत येईल असे गायकवाड यांनी सांगितले. पुण्याहून ‘हास्य सम्राट’ फेम देवा झिंजाड, जळगावहून नीलेश कळसकर, मुंबईतून सुशिलदत्ता शिंदे, औरंगाबादहून अंबिका टाकळकर यांनीही मदत निधी जमविण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
ऑटीझम आजाराने त्रस्त असलेल्या औरंगाबाद येथील आरंभ ऑटीझम सेंटरच्या बालकांनी देखील या मदत निधीसाटी आपला सहभाग नोंदवला असल्याचे गायकवाड यांनी नमूद केले आहे.

Story img Loader