वर्धा : आधुनिक वैद्यकीय अभ्यासक्रमातील लैंगिक क्रियांच्या वर्गीकरणातून ‘अनैसर्गिक’ हा शब्द बाद करण्याचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने घेतला आहे. सेवाग्रामचे डॉ. इंद्रजीत खांडेकर यांच्यासह इतर चार तज्ज्ञांच्या समितीने शिफारस केल्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतला. ‘एमबीबीएस’च्या न्याय वैद्यकशास्त्र या विषयातील गुदासंभोग (सोडोमी), मुखमैथुन यासारख्या लैंगिक क्रियांच्या वर्गीकरणात आता अनैसर्गिक शब्दाचा उपयोग करता येणार नाही.
वैद्यकीय अभ्यासक्रमात फक्त योनीद्वारे होणाऱ्या संभोगाला नैसर्गिक व इतर लैंगिक क्रियांना अनैसर्गिक संबोधले जात होते. आता यापुढे असे वर्गीकरण करता येणार नाही. वैद्यकीय अभ्यासक्रमातील ‘एलजीबीटी’ समुदायाबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. वैद्यक आयोगाच्या वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष अरुणा वाणीकर यांनी त्या अनुषंगाने एक तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. यात डॉ. इंद्रजीत खांडेकर, डॉ. विजेंद्रकुमार (दिल्ली), डॉ. प्रभा चंद्रा (बंगळूरू) व डॉ. सुरेखा किशोर (गोरखपूर) या तज्ज्ञांचा समावेश होता. या समितीने ‘अनैसर्गिक’बाबतचा आपला अहवाल दिला आहे.
समितीचा निष्कर्ष काय?
समितीच्या मते, कुठलीही लैंगिक क्रिया व्यक्तीला व जोडीदाराला अनुकूल असेल तर ती क्रिया हानीकारक किंवा अनैसर्गिक नाही, अशी वैद्यकीय भूमिका आहे. तरीही दुर्दैवाने पारंपरिक लैंगिक संभोगाव्यतिरिक्त वापरल्या जाणाऱ्या इतर लैंगिक क्रियांना अनैसर्गिक संबोधले जाते. योनीद्वारे होणारा संभोग किंवा इतर कुठल्याही लैंगिक क्रियेमुळे जर जोडीदाराला त्रास होत असेल तर ती क्रिया अपायकारक समजली जाते. तसेच ती क्रिया बळजबरीने किंवा अल्पवयीन मुलांमुलीसोबत केली जात असेल तरच ती हानीकारक, असामान्य, आरोग्यास अपायकारक आहे, असे मानले जाते.
सोडोमी ही पूर्णपणे नैसर्गिक स्थिती आहे. ती मानवी लैंगिकतेचा नैसर्गिक व सामान्य प्रकार असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा नोंदवले आहे. म्हणूनच स्वेच्छेने व संमतीने होणाऱ्या लैंगिक (गुदा, मुखमैथुन) क्रिया यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अनैसर्गिक वर्गीकरणातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.- डॉ. इंद्रजीत खांडेकर