जातींचे आरक्षण हे सध्या राजकारणाचा केंद्रबिंदू झाले आहे. आरक्षण असलेच पाहिजे याविषयी दुमत असण्याचे कारण नाही, पण त्याला उद्योजकता विकासाची जोड देत आरक्षणाच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल, असे मत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले.
‘बदलता महाराष्ट्र’ उपक्रमात ‘सामाजिक मुद्दय़ांचा राजकारणावरील परिणाम’ या विषयावरील दुसऱ्या दिवशीच्या सांगता सत्रातील परिसंवादात ते बोलत होते. राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. सुहास पळशीकर आणि शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक प्रकाश पवार हे मान्यवही सहभागी झाले होते. सहस्रबुद्धे म्हणाले, सामाजिक चळवळी मंदावल्या आहेत. प्रसार माध्यमांची प्रबोधनाची परंपरा पातळ झाली आहे. स्वयंसेवी संस्था ताकद हरवून बसल्या आहेत. राजकारणाला तर सामाजिक मुद्दय़ांचा पत्ताच नाही. त्यामागे बदलती जीवनशैली हा अंगभूत घटक असून आपलं जगणं दृश्यमानताप्रधान झाले आहे. व्यक्तिगतता महत्त्वाची झाल्याने माणूस चंगळवादाकडे झुकला. भ्रष्टाचार हा मुद्दा केवळ राजकारणालाच ग्रासतो असे दिसत नाही, याला जनताही जबाबदार आहे. मूल्यविवेक विसरत चालल्याने ही परिस्थिती ओढवली. दांभिकतेचा सुळसुळाट झाला असून निवडणूक प्रक्रियेचे तंत्रबहाद्दरीकरण झाले आहे. यशस्वीतेचा जनादेशाशी संबंध असतोच असे नाही. प्रामाणिकपणा, निष्ठा, परिश्रम यांना परमोच्च स्थान देणारा वर्ग आणि व्यवस्थापन कौशल्य, परिणामकारकता या मूल्यांच्या समन्वयातूनच पुढे जावे लागेल.
पळशीकर म्हणाले, राजकारण हा समाजकारणाचा भाग असेल, तर सामाजिक मुद्दे आणि चळवळी हा त्याचा अविभाज्य घटक आहे. सार्वजनिक हिताचा विचार आणि ते अमलात आणण्यासाठी प्रयत्न करण्यामध्ये चळवळींचा रेटा उपयुक्त ठरतो. चळवळींमुळे झालेल्या रेटय़ाचा परिणाम होऊन देवदासी निर्मूलन आणि हमालांना वेतन यासंबंधीचे कायदे झाले आहेत. काहीशा दु:खद पाश्र्वभूमीवर का होईना अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा संमत झाला. राजकारणापासून फटकून राहण्यामुळे काही चळवळींचे ‘एनजीओ’करण झाले, काही चळवळी एककलमी झाल्या. सामाजिक मुद्दे राजकारणातून अदृश्य झाले आहेत. सार्वजनिक हिताचा नांगर सोडल्यास राजकारणाची बोट बुडू शकते.
प्रकाश पवार म्हणाले, पूर्वी राज्यसंस्था धोरणे ठरवून लोकांवर नियंत्रण ठेवत होती. मात्र, आता नागरी समाज आणि बाजारपेठ राजकारण करू लागले आहे. सोशल मीडिया प्रभावी ठरतो आहे. राजकारणापासून दूर गेलेले अनेक जण मतदानात सहभागी होत असल्याने टक्केवारी वाढली आणि त्याचा फायदा भाजपला झाला. धर्म कसा वापरावा हे काँग्रेस विसरली. भाजपने ती पोकळी भरून काढली. आक्रमक हिंदूत्व पुढे न आणता हिंदू परंपरेची उदाहरणे सातत्याने मांडली आणि त्या माध्यमातून कायापालट झाला.
जातींच्या आरक्षणापलीकडे जाऊन विचार करावा – सहस्रबुद्धे
जातींचे आरक्षण हे सध्या राजकारणाचा केंद्रबिंदू झाले आहे. आरक्षण असलेच पाहिजे याविषयी दुमत असण्याचे कारण नाही, पण त्याला उद्योजकता विकासाची जोड देत आरक्षणाच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-09-2014 at 03:32 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National vice president of the bharatiya janata party vinay sahasrabuddhe in loksatta badalta maharashtra