“जागा वाटप करताना आपल्याला लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागायची. पण आता आपण काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत. कारण त्यांच्या ४४ जागा आहेत आणि ५४ जागा आहेत. उद्धव ठाकरेंकडे ५६ आमदार होते. हे गणित आहे”, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता महाविकास आघाडीतच अंतर्गत वाद सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावरून महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.
अजित पवार काय म्हणालेत?
“आपण महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहोत. आघाडी आपल्याला मजबूत ठेवायची आहे. पण हे करत असताना लक्षात ठेवा की तुमची ताकद जास्त असेल तरच तु्म्हाला महाविकास आघाडीत महत्त्व दिलं जाईल. याआधीच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या जागा जास्त असायच्या. जागा वाटप करताना आपल्याला लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागायची. पण आता आपण काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत. कारण त्यांच्या ४४ जागा आहेत आणि ५४ जागा आहेत. उद्धव ठाकरेंकडे ५६ आमदार होते. हे गणित आहे.” असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरायचा आहे. मात्र त्याआधीच आम्ही मोठा भाऊ आहोत असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवारांनी सांगितलं आहे. राजकीय वर्तुळात या वक्तव्याची चर्चा होऊ लागली आहे.
हेही वाचा >> “महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ कारण…” अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत
संजय राऊतांचं प्रत्युत्तर काय?
“सगळ्यांची डीएनए टेस्ट करू आम्ही एकदा. हा विनोद समजून घ्या. लहान भाऊ, मोठा भाऊ हा विषय मधल्या काळात शिवसेना-भाजपा युतीमध्ये सुद्धा आला होता. तेव्हाही मी म्हणालो होतो की डीएनए टेस्ट करावी लागेल. महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारे अशाप्रकारचे मतभेद नाहीत. अजित दादा काय म्हणतात? आम्ही काय म्हणतो? याही पेक्षा प्रत्येकजण आपआपल्या पक्षाची भूमिका मांडत असतो. आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याकरता अशा भूमिका घ्याव्या लागतात. लोकसभेच्या जागावाटपाची प्रक्रिया सुरू आहे. आधी लोकसभेची निवडणूक होईल, मग विधानसभेची होईल. लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात प्रमुख पक्षांच्या बैठका सुरू आहेत. या बैठकीत काय ठरतंय हे मी तुम्हाला बाहेर सांगणार नाही”, असं संजय राऊत म्हणाले.