योगेश मेहेंदळे
श्री. ना. पेंडसे यांनी मराठी साहित्यात अजरामर केलेला दापोली तालुक्यातील हण्र-मुरुड परिसर म्हणजे कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या स्वप्नामधला महत्त्वाचा दुवा. सरकारने कोकणचा कॅलिफोर्निया केला नसला तरी ‘निसर्ग’ चक्रीवादळाने सैबेरिया करण्याचा मात्र पुरेपूर प्रयत्न केला आहे.
मुंबई-पुण्यासह अनेक महत्त्वाच्या शहरांना दर्जेदार मासळीचा पुरवठा करणाऱ्या या निसर्गरम्य परिसराची चक्रीवादळाने धूळधाण उडवली. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी राज्य सरकारने ७५ कोटी रुपयांची आपत्कालीन मदत जाहीर केली असून, ती कुणाच्या पासंगाला पुरणार, असा स्थानिकांचा सवाल आहे.
नारळ, सुपारी, आंबा यांचे उत्पन्न मिळायला १० ते १५ वर्षांचा कालावधी लागतो. लाखांच्या घरात झाडे जमीनदोस्त झाली असून आर्थिक नुकसान शेकडो कोटींचे आहे. त्यातही हे नुकसान अन्य पिकांसारखे एका वर्षांपुरते नसून पुढील १० ते १५ वर्षांसाठी झाले आहे. याचा विचार नुकसानीचा अंदाज बांधताना व्हावा अशी लोकांची अपेक्षा आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जरी आले नसले तरी मंत्री अनिल परब, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, इतकेच काय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील या भागाची पाहणी करून गेले आहेत. हर्णै, मुरुड, केळशी, आंजर्ला, वेळास, कोळथरे या भागांमध्ये चक्रीवादळाने अवघ्या काही तासांत इथल्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडला. स्वत:च्या मस्तीत जगणारे आणि सरकारी अर्थसंकल्पावर अवलंबून न राहता निसर्गाच्या कृपेवर हक्काचे दोन घास मिळवणारे कोकणवासी त्यामुळे मेटाकुटीस आले आहेत. आम्ही जवळपास १० ते १५ वर्षे मागे फेकले गेलो आहोत, अशी व्यथा घरात वीज-पाण्याचा पत्ता नसलेले गावकरी सपाट झालेल्या नारळी-पोफळीच्या बागांकडे बघत व्यक्त करीत आहेत.
बागा जमीनदोस्त
हर्णै, आंजर्ला, केळशी या बंदरपट्टीच्या परिसराची लोकसंख्या १५ ते २० हजारांच्या आतबाहेर आहे. या भागात नारळी-पोफळीची एकही बाग वाचली नाही. आंजल्र्याचे विजय निजसुरे यांनी सांगितले की, आमच्या सगळ्यांच्याच बागा भुईसपाट झाल्या. गेल्या काही वर्षांमध्ये लागवड केलेले जायफळही भुईसपाट झाले.
जिल्ह्यात १,००० कोटींचे नुकसान
रत्नागिरी जिल्ह्य़ात किमान एक हजार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज भाजपचे नेते केदार साठे यांनी व्यक्त केला. दापोली ते वेळास पट्टय़ामध्ये घरे- बागांचेच नाही तर बोटी आणि मच्छीमारांचेही अतोनात नुकसान झाले. हर्णै, आंजर्ले, पाज आदी बंदरांमध्ये मिळून सुमारे एक हजार मच्छीमारी बोटी आहेत. पावसाळ्यासाठी प्लास्टिकने झाकायची शेकडो बोटींची यंत्रणाच वादळात नष्ट झाली आहे. अनेक बोटींचे नुकसान लाखांमध्ये असल्याचे, हर्णैमधल्या हरेश कुलाबकर यांनी सांगितले.
‘एनडीआरएफ’चे कौतुक
राष्ट्रीय आपत्ती कृती दलाचे (एनडीआरएफ) दापोली ते आंजर्ला भागात कौतुक होत आहे. ३ मे रोजी दुपारी वादळाचा जोर ओसरल्यावर एनडीआरएफच्या पथकाने दुपारी दापोलीपासून मुख्य रस्ता मोकळा करायला सुरुवात केली. रात्री दहा वाजेपर्यंत त्यांनी दापोली ते आंजर्ला रस्ता संपूर्णपणे मोकळा केला. वृक्ष हलवताना काही विंचू बाहेर पडून एका जवानाला दंश केला. म्हणून रात्री त्यांनी काम थांबवले व सकाळी पुन्हा सुरू केले, असे स्थानिकांनी सांगितले.
मोबाइल मनोरे भुईसपाट
हर्णै परिसरातील ‘आयडिया’ कंपनीचा मोबाइल मनोरा भुईसपाट झाला. त्यामुळे मोबाइल सेवाही बंद आहे. या मनोऱ्याच्या देखभालीसाठी तैनात असलेल्या पंकज धटावळे या राजावाडीमध्ये राहणाऱ्या तरुणाने सांगितले की, वादळाचे अक्राळविक्राळ रूप बघितले आणि विनाशाच्या कल्पनेने मला रडूच कोसळले. केबिन बंद करून निघाल्यावर काही वेळातच जोरदार आवाज होत मोबाइलचा मनोरा जमीनदोस्त झाला.
विजेविना व्यवहार ठप्प
दापोली ते बंदरालगतच्या गावांमध्ये जवळपास सर्वच विजेचे खांब वाकलेले, पडलेले आहेत. दापोलीत एक आठवडा वीज नव्हती, त्यानंतर काही प्रमाणात पुरवठा सुरळीत झाला. बंदरांलगतच्या आधीच उपेक्षित असलेल्या गावांमध्ये अजूनही अंधार आहे. धरणात पाणी आहे, पण विजेअभावी ते गावांमध्ये पोचवता येत नाही. प्रत्येक गावात २० ते ३० जणांचा गट वीज मंडळाच्या दिमतीस देण्याची तयारी तरुणांनी दर्शवली आहे.