बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यास नकार देणाऱ्या नवी मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जाधव यांच्याविरोधात विभागीय चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी हा आदेश दिला आहे.
महेश जाधव यांच्यावर तक्रारदार महिलेला 50 हजार रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप असल्याची माहिती संजय कुमार यांनी दिली आहे. प्रकरण मिटवण्यासाठी हे पैसे आरोपीच्या कुटुंबीयांकडून महिलेला देण्यात येणार होते.
दरम्यान या प्रकरणात अजून एका पोलीस अधिकाऱ्याचं नाव आलं असून सध्या त्याच्यावर नजर आहे. पोलीस उपायुक्त अशोक दुडे प्राथमिक चौकशी करत असून त्यातून समोर येणाऱ्या माहितीच्या आधारे या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.
एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, महेश जाधव यांच्यावर आरोप करु शकत नाही कारण पोलीस गुन्हा दाखल करण्यास तयार होते, मात्र तक्रारदार महिलेने थोडा वेळ मागितला होता. महिला आपल्या काही मित्रांसोबत पोलीस ठाण्यात आली होती. यावेळी तिने तक्रार करण्याआधी थोडा विचार करायचा असल्याचं पोलिसांना सांगितलं होतं.
मात्र महिलेचे वकील महेश वासवानी यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. ‘जर हे खरं असेल तर पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्हा का दाखल केला’, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. आरोपीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रारदार महिलेला मारहाण करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज जारी का करत नाहीत असा सवाल त्यांनी विचारला आहे.
महिलेने जेव्हा पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्याकडे तक्रार केली तेव्हा कुठे पोलिसांनी हालचाल करण्यास सुरुवात केली असं महेश वासवानी यांनी सांगितलं आहे. गुरुवारी पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली श्रीजीथ जॉन याला अटक केली. शनिवारी रात्री घरी पार्टीदरम्यान महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.