राम मंदिराच्या उद्घाटनानंतर महाराष्ट्रात आणि देशात विरोधकांच्या आघाड्यांमध्ये मोठी फूट पडेल असं वक्तव्य खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे. सगळे विरोधक केवळ फोटो काढून घेण्यासाठी एकत्र येत आहेत. परंतु, त्यांच्यात कसलाही ताळमेळ नाही, असं नवनीत राणा म्हणाल्या. तसेच नवनीत राणा यांचे पती आणि आमदार रवी राणा यांनीदेखील महाविकास आघाडीत फूट पडेल असा दावा केला आहे. महाविकास आघाडीत सध्या तीन पक्ष असून राम मंदिराच्या उद्घाटनानंतर या तीनपैकी दोन पक्ष भाजपाला पाठिंबा देतील, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे.
खासदार नवनीत राणा म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीआधी जो संकल्प केला होता तो त्यांनी २०२३ मध्ये पूर्ण केला आणि आता २०२४ मध्ये त्याचं उद्घाटन होणार आहे. रामलल्ला आता स्वतःच्या घरात विराजमान होणार आहेत. या देशाचं आराध्य दैवत असलेल्या रामाची प्रार्थना आता त्याच्या घरात होईल. परंतु, आता जे लोक बोंबा मारत आहेत, जेवढे विरोधी पक्ष आहेत, जेवढे विरोधक गर्दी करून उभे आहेत, केवळ फोटोसाठी गोळा होतायत, ज्यांचा आपसात कुठलाही ताळमेळ नाही त्यांच्यात एक स्फोट होणार आहे. एकीकडे राम मंदिराचं उद्घाटन होईल आणि दुसऱ्या बाजूला यांच्या युतीत स्फोट होऊन अनेकजण वेगळे होतील.
आमदार रवी राणा म्हणाले, महाविकास आघाडीत सध्या तीन पक्ष आहेत. त्यातले दोन पक्ष लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील. राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतर महाविकास आघाडीतले दोन पक्ष भाजपाला पाठिंबा देतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. प्रभू श्रीराम हे मंदिराच्या उद्घाटनानंतर तुम्हाला या देशात, महाराष्ट्रात अनेक चमत्कार दाखवतील.
हे ही वाचा >> “प्रयोगशाळांमध्ये डीएनए चाचण्यांसाठी किट्स नाहीत, हायप्रोफाईल आरोपींच्या मदतीसाठी…”, ठाकरे गटाचा गंभीर आरोप
‘शिवमहापुराण कथे’तून अमरावतीत राणा दाम्पत्याने मागितला मतांचा जोगवा
अमरावती शहराजवळ नवनिर्मित हनुमान गढी येथे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनीपंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. याद्वारे त्यांनी केलेल्या राजकीय प्रचाराची सध्या अमरावतीत चर्चा रंगली आहे. या कथावाचनाच्या कार्यक्रमाच्या अखेरच्या दिवशी पंडित मिश्रा यांनी धर्माचे कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी उभे रहावे असे सांगून राणा दाम्पत्याला मतांचे दान करा, असे आवाहन लोकांना केले. त्यातून धार्मिक प्रवचनापेक्षा निवडणुकीच्या प्रचाराचा राणा दाम्पत्याचा अंतस्थ हेतू उघड झाला आहे.