Navneet Kaur Rana On Lok Sabha Election defeat : “मी निवडणुकीत पराभूत झाले आहे, परंतु मी माझी हिंमत गमावलेली नाही”, असं वक्तव्य माजी खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे. त्या म्हणाल्या, “माझा पराभव पाहून अनेकांना आनंद झाला आहे, परंतु मला त्याबद्दल काही वाटत नाही. मला दुःख एका गोष्टीचं आहे की माझी अमरावती १० वर्षे मागे गेली आहे”. अमरावतीमध्ये आयोजित भाजपाच्या एका कार्यक्रमात नवनीत राणा बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी शेरोशायरी केल्याचं पाहायला मिळालं. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या भाजपाच्या तिकीटावर अमरावती मतदारसंघातून उभ्या राहिल्या होत्या. मात्र काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांनी २० हजार मतांनी नवनीत राणा यांचा पराभव केला. “या पराभवाने मी खचून गेले नाही”, असं राणा यांनी म्हटलं आहे.
नवनीत राणा म्हणाल्या, “मैं जरूर हार गयी हूँ, पर मेरी हिम्मत को हारने नही दूंगी (मी पराभूत झालेय खरी, परंतु, मी माझी हिंमत हरणार नाही), माझ्या पराभवामुळे अनेकांना आनंद झाला आहे. मात्र, मला दुःख वेगळ्याच गोष्टीचं आहे. माझी अमरावती १० वर्षे मागे जात आहे हे पाहून मला खूप वेदना होत आहेत.” नवनीत राणा यांनी यानंतर एक शेर ऐकवला.
लौटेंगे फिर एक दिन उसी अंदाज में
लौटेंगे फिर एक दिन उसी अंदाज में
कई बादल छाने से सूरज का अस्तित्व खत्म नहीं होता!
लोकसभेतील पराभवाबाबत नवनीत राणा काय म्हणाल्या?
लोकसभेतील पराभवाबाबत गेल्या आठवड्यात नवनीत राणा म्हणाल्या होत्या, फार थोड्या मतांनी मी पराभूत झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधकांनी एकत्र येऊन मतदान केलं. पण आम्ही नरेंद्र मोदींविषयी प्रेम दाखवण्यात कुठेतरी कमी पडलो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील पराभवाबद्दल केंद्रामध्ये जाऊन उत्तर द्यावं लागलं, याबाबत माझ्या मनात कायम खंत राहील.
हे ही वाचा >> CP Radhakrishnan : “चुकीच्या पक्षातील चांगला माणूस”, विरोधकांनीही कौतुक केलेले सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
नवनीत राणा म्हणाल्या, सुमारे ५ लाखांच्या वर मतं मिळाल्यानंतरही आम्हाला विजय मिळवता आला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी देव होते, म्हणून त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेता आली. सरकार स्थापन करताना एकेक खासदार महत्वाचा असतो. अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार केवळ एका मताने कोसळलं होतं, याची आठवण आपल्याला येत होती. भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते आहे. या पराभवात कोणाचीही चूक नाही, आम्हीच काही अंशी कमी पडलो.