अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या भाजपाच्या चिन्हावर (कमळ) निवडणूक लढवणार असल्याचा दावा गेल्या काही दिवसांपासून केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून जातप्रमाणपत्राच्या खटल्यात दिलासा मिळाल्यास नवनीत राणा भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. गुरुवारी (१५ मार्च) नवनीत राणा यांचे पती आणि आमदार रवी राणा यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र भाजपाचे प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत नवनीत राणा कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार यावर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. खासदार राणा म्हणाल्या, माझ्या निवडणूक लढण्याबाबत जे काही निर्णय घ्यायचे असतील ते आमच्या पक्षाचे प्रमुख रवी राणा घेतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते आहेत. भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढण्याच्या चर्चेवरही त्यांनी भाष्य केलं. त्या टीव्ही ९ मराठीशी बोलत होत्या.
नवनीत राणा म्हणाल्या, आज तरी मी स्वाभिमान पक्षासाठी काम करतेय. मी आमच्या पक्षाच्या नावानेच माझ्या मतदारसंघात प्रचार सुरू केला आहे. मी गेल्या पाच वर्षांपासून माझ्या मतदारसंघात काम करतेय. मुळात प्रचार सुरू करायला गेल्या पाच वर्षांमध्ये माझं काम कधी बंद पडलंच नाही. अमरावतीला ज्या वेगाने विकास हवा होता, त्याच वेगाने आम्ही काम केलं आहे.
कोण म्हणतंय की माझं भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवणं निश्चित झालंय? अद्याप तसं काही झालेलं नाही. ते निश्चित होण्यासाठी आमच्या युवा स्वाभिमान पक्षातील नेते चर्चा करतील आणि निर्णय घेतील. पक्षाच्या कार्यकारिणीतले सदस्य आणि आमच्या पक्षाचे अध्यक्ष रवी राणा यांच्या बैठकीत यावर निर्णय घेतला जाईल. मी तर पक्षाची एक सामान्य कार्यकर्ती आहे. कार्यकर्ती म्हणूनच पक्षासाठी काम केलं आहे. पक्षाने माझं समर्थन केलं, मला तिकीट दिलं आणि दोन वेळा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. युवा स्वाभिमान पक्षाकडून तिकीट मिळेल ही गोष्ट गाठीशी बांधूनच मी माझी तयारी केली आहे. आजही मी माझ्या मतदारसंघात आमच्या पक्षाचाच प्रचार करत आहे.
हे ही वाचा >> “शरद पवारांचा फोटो वापरा आणि मतं मागा हे..”, छगन भुजबळांचं ‘त्या’ आरोपावर स्पष्टीकरण
नवनीत राणा म्हणाल्या, आम्ही ज्यांना आमचे नेते मानतो ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यावर त्यांचं मत देतील. तसेच निवडणूक कुठल्या पक्षाकडून लढवायची ते आमच्या पक्षाचे म्हणजेच युवा स्वाभिमानचे अध्यक्ष रवी राणा आणि आमच्या पक्षाची कार्यकारिणी ठरवेल.