शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हकालपट्टीची मागणी केलीय. तसेच दोन दिवसात भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरून न हटवल्यास महाराष्ट्र बंदची हाक दिली. यानंतर यावर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे राज्यपाल या संवैधानिक पदाबाबत राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. त्या शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) अमरावतीत एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होत्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवनीत राणा म्हणाल्या, “भगतसिंह कोश्यारी तसं जाणीवपूर्वक बोलले की अचानक विचार न करता बोलले हे माहिती नाही. मात्र, आम्ही स्वतः त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. राज्यपाल हे संवैधानिक पद आहे. त्यांना हटवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याकडे जावं लागेल.”

“उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत”

“शिवाजी महाराजांवर असं कोणीही बोलू नये. एवढ्या मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने तर अजिबात बोलू नये. मात्र, यांना पदावरून हटवा, नाही तर पूर्ण महाराष्ट्र बंद करू असं म्हणून उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत. महाराष्ट्र बंद करणं म्हणजे खूप लोकांना अडचणीत आणणं आहे. या पदावर राजकारण करू नये,” असंही मत राणांनी व्यक्त केलं.

“मोठे पप्पू आत्ताच महाराष्ट्रातून गेले, आता दुसरे पप्पूही निघालेत”

नवनीत राणा म्हणाल्या, “मोठे पप्पू आत्ताच महाराष्ट्रातून गेले. आता दुसरे पप्पूही निघालेत. शरद पवार असो की आमचे इतर मोठे नेते ज्यांना आम्ही फॉलोव करतो त्यांना महाराष्ट्राच्या जनतेवर आणि निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळेच ते महाराष्ट्र सोडून बाहेरची मदत घेण्याची गरज पडत नाही.”

हेही वाचा : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण : नवनीत राणा यांच्याविरोधातील अजामीनपात्र अटक वॉरंटवर कारवाई का नाही?

“अशा पप्पू लोकांनाच महाराष्ट्रावर विश्वास नाही”

“अशा पप्पू लोकांनाच महाराष्ट्रावर विश्वास नाही. महाराष्ट्रातील जनतेवर विश्वास नाही म्हणूनच दुसऱ्या राज्यात जाऊन इतरांसमोर हात पसरत आहेत. त्यांनी इथं महाराष्ट्रात काम केलं असतं आणि गरीब जनतेमध्ये राहिले असते, त्यांच्या प्रश्नांवर काम केलं असतं तर महाराष्ट्राचं खूप चांगलं झालं असतं,” असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneet rana criticize uddhav thackeray over maharashtra band mention pm narendra modi pbs