अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांच्यात चांगलाच शाब्दिक संघर्ष रंगला आहे. काही दिवसांपूर्वी जलील यांनी राणा यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता नवनीत राणा यांनीदेखील जलील यांना थेट आव्हान दिले. हिंमत असेल तर माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा. मला पराभूत करून दाखवा, असे राणा म्हणाल्या आहेत. त्या अमरावतीत एका कार्यक्रमात बोलत होत्या.
“हिंमत असेल तर…”
“मी त्या दिवशी संसदेत म्हणाले होते की या देशात राहायचे असेल तर जय श्री राम म्हणावे लागेल. नवनीत राणा यांना पराभूत करण्यासाठी आम्ही अमरावतीत येऊ, असे खासदार इम्तियाज जलील म्हणाले. पण त्यांच्यासारखे किती आले आणि किती गेले. हिंमत असेल तर त्यांनी अमरावतीमध्ये येऊन माझ्याविरोधात निवडणूक लढवावी. मला पराभूत करून दाखवावे,” असे खुले आव्हान नवनीत राणा यांनी जलील यांना दिले.
तुमच्यासारखे ५६ आले आणि गेले
“जलील यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढवली नाही, तर ते छत्रपती संभाजीनगरमध्ये कसे निवडून येतील, ते मी बघते. इम्तियाज जलील हे असदुद्दीन ओवैसी यांचे चमचे आहेत. संभाजीनगरचे लोक यावेळी जलील यांना निवडून येऊ देणार नाहीत,” असा विश्वासही नवनीत राणा यांनी व्यक्त केला. माझी विचारधारा माझ्यासोबत आहे. तुमच्यासारखे ५६ आले आणि गेले. मी एक महिला आहे. मी पदर खोचून मैदानात उभी राहिले तर तुम्हाला पराभूत करेन. मी जलील यांना घाबरणारी नाही, असेदेखील राणा म्हणाल्या.
संसदेतील भाषणामुळे दोन्ही नेते आमनेसामने
दरम्यान, संसदेत बोलताना नवनीत राणा यांनी देशात राहायचे असेल तर जय श्री राम म्हणावे लागेल, असे विधान केले होते. त्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राणा यांच्यावर टीका केली होती. आता राणा यांनीदेखील जलील यांना मला निवडणुकीत पराभूत करून दाखवा म्हणत खुले आव्हान दिले आहे. त्यामुळे जलील नवनीत राणा यांना काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.