हनुमान जयंती जवळ येते आहे. त्या निमित्ताने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे अमरावती आणि मुंबईत लागलेले बॅनर्स लक्ष वेधून घेत आहेत. भगवी शाल घेतलेला नवनीत राणा यांचा भला मोठा फोटो या बॅनरवर लावण्यात आला आहे. त्या बॅनरवर नवनीत राणा यांचा उल्लेख ‘हिंदू शेरनी’ असा करण्यात आला आहे. ६ एप्रिलला हनुमान जयंती होणार आहे. त्या अनुषंगाने अमरावतीत जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुंबई आणि अमरावती या दोन्ही ठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाविकास आघाडीच्या काळात काय घडलं होतं?

नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनीही आम्ही मुंबईत येऊन मातोश्री या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा म्हणणार आहोत असं सांगितलं होतं. ज्यामुळे बराच राडा झाला होता. नवनीत राणा आणि रवी राणा हे दोघंही जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांना मातोश्रीवर जाण्यापासून रोखण्यात आलं होतं. त्यानंतर आम्ही हनुमान चालीसा म्हणणार नाही असं सांगितलं तरीही या दोघांना अटक करण्यात आली. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दोघांनाही १४ दिवस तुरुंगात रहावं लागलं. या सगळ्या संघर्षाचे फोटो या बॅनरवर लावण्यात आले आहेत.

नवनीत राणा आणि रवी राणा यांचे तुरुंगवासाचे फोटोही बॅनरवर

अमरावतीत हनुमानाची भव्य मूर्ती उभारली जाणार आहे. त्या मूर्तीचा फोटोही या बॅनरवर आहे. तसंच ‘हिंदुत्व हाच श्वास धर्मरक्षणाची आस’ असा संदेश बॅनरवर लिहिण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही फोटो या बॅनरवर लावण्यात आले आहेत. तसंच रवी राणा आणि नवनीत राणा यांना १४ दिवस तुरुंगात जावं लागलं होतं, त्या तुरुंगवासाच्या वेळी जेव्हा पोलीस ठाण्यात आलं होतं त्यावेळचे फोटोही या बॅनरवर आहेत.

१११ फूट उंच मूर्तीही उभारली जाणार

हनुमान चालीसा पठण करण्यावरून चर्चेत आलेल्या राणा दाम्पत्याच्या पुढाकारातून अमरावतीत १११ फूट उंचीची हनुमानाची भव्य मूर्ती उभारली जाणार आहे. अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरात हे मंदिर उभारलं जातंय. या भव्य मूर्तीचं काम सुरु करण्यात आलंय. तर येत्या ६ एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त या मंदिराचं भूमीपूजन होणार आहे. यावेळी राणा दाम्पत्यातर्फे सामूहिक हनुमान चालिसा पठणाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला भाजपा आणि शिवसेनेचे दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.