Navneet Rana : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सध्या सुरु आहे. मात्र, प्रचार सुरु असताना अमरावतीमध्ये माजी खासदार नवनीत राणा यांच्या प्रचारसभेत शनिवारी राडा झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी काही लोकांनी नवनीत राणा यांच्यासह त्यांच्या काही कार्यकर्त्यांवर खुर्च्या फेकत हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. माहितीनुसार, शनिवारी रात्री दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील खल्लार या गावात नवनीत राणा यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी नवनीत राणा यांचं भाषण सुरु असताना काही लोकांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी नवनीत राणा यांच्या दिशेने खुर्च्या फेकत काही लोकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर आज नवनीत राणा यांनी माध्यमांशी संवाद साधत काल झालेल्या सभेत नेमकं काय घडलं होतं? याबाबत माहिती सांगितली. तसेच यावेळी नवनीत राणा यांनी सभेत राडा घालणाऱ्यांना इशारा देत गंभीर आरोप केले आहेत. ‘काल सभेनंतर खुर्च्या फेकण्यात आल्या, माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्न करण्यात आला’, असे गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केले आहेत.
नवनीत राणा काय म्हणाल्या?
“कालच्या सभेत जवळपास २०० ते २५० अपंग लोक बसलेले होते. ते सर्व मला भेटण्यासाठी आले होते. ज्यावेळी मी सभेत भाषण करत होते. तेव्हा काहींनी वक्तव्य केले. त्यावेळी एवढ्या लांबून देखील अल्ला हू अकबरचे नारे ऐकू येत होते. त्यावेळी त्या ठिकाणी माझे काही कार्यकर्ते होते, ते ऐकत होते. तेव्हा काही चुकीचे शब्दही वापरण्यात आले. यावेळी माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना शांतता ठेवण्यास सांगितलं. आम्ही शांततेत सभा करून जाणार आहोत, असं आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. मात्र, सभा संपल्यानंतर मी लोकांना भेटत होते. त्यावेळी मी लोकांशी संवाद साधत होते. तेव्हा तुला मारून टाकू, अशा पद्धतीची धमकी देण्यात आली. तरीही मी म्हटलं की शांतता ठेवा. पण त्याचवेळी लगेच काहींनी खुर्च्या उचलल्या आणि आमच्या लोकांवर फेकल्या. त्यानंतर आमच्या काही लोकांनी मला गाडीत बसवलं. मी नसते तर खल्लार गावातील दोन लोकांचा जीव त्या लोकांनी घेतला असता”, असा गंभीर आरोप नवनीत राणा यांनी केला.
हेही वाचा : “मी लष्कर-ए-तोयबाचा सीईओ बोलतोय, तुमच्या मागचा रस्त्यावर…”; रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन!
“एवढंच नाही तर माझ्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला. तसेच माझ्याबरोबर असलेल्या महिला सुरक्षारक्षकांनाही काही खुर्च्या लागल्या. या सर्व प्रकरणावरून हे लक्षात येतं की, जे व्यक्ती आपल्या विचारांसाठी लढत आहेत. जो विचार आपण घेऊन चालत आहोत. आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन पुढे जाणारे लोक आहोत. आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत. मात्र, जर त्यांची भाषा कापण्याची असेल तर आमचीही भाषा त्याच पद्धतीची असेल. आम्ही देखील शांत बसणार नाहीत”, असा इशाराही नवनीत राणा यांनी दिला.
“ज्या गावात हा प्रकार घडला, ते गाव शिवसेना ठाकरे गटाच्या तालुकाध्यक्षांचं आहे. आधी व्यासपीठावरून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर आम्ही सभेसाठी व्यासपीठ उभं केलं होतं. मात्र, त्यानंतर त्या सभेला मला उशीर झाला. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर ते सभेसाठी आलेल्या महिला आणि लोकांबाबत अपशब्द बोलत होते. अशा पद्धतीचा व्यवहार त्यांनी केला. हे स्पष्ट आहे की ज्यांचे तालुकाध्यक्ष आहेत आणि आज उद्धव ठाकरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे नाही, तर जनाब उद्धव ठाकरे झाले आहेत. हे काल स्पष्ट दिसलं. तसेच काहींची एवढी हिंमत वाढली की लोकांना मारणं आणि मारण्याची धमकी देण्याचा प्रकार अमरावतीत घडत असेल तर आम्ही शांत बसणार नाहीत”, असं नवनीत राणा यांनी म्हटलं.