आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत कौर-राणा यांनी आज (१९ सप्टेंबर) अमरावतीत दहीहंडी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या दहीहंडीच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी फडणवीस यांचं स्वागत करताना नवनीत कौर यांनी फडणवीस यांचा लोकांच्या मनातले मुख्यमंत्री असा उल्लेख केला. खासदार नवनीत कौर म्हणाल्या, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आमच्या मनातले मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानायला हवेत. कारण आपण अमरावतीकरांनी गेल्या वर्षी त्यांच्याकडे टेक्सटाईल पार्कची मागणी केली होती, जी त्यांनी पूर्ण केली आहे.
नवनीत कौर म्हणाल्या, अमरावतीच्या युवकांना रोजगार मिळावा, जिल्ह्यात कोणीही बेरोजगार राहू नये यासाठी आपण फडणवीस यांच्याकडे टेक्सटाईल पार्कची मागणी केली होती. यासाठी जिल्ह्यात १०,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक यावी अशी विनंती केली होती. फडणवीस यांनी आपलं भविष्य वाऱ्यावर सोडलं नाही. त्यांनी आपल्याला टेक्सटाईल पार्क दिलं आहे. त्यासाठी त्यांचे अभार मानले पाहिजेत.
केंद्र सरकारच्या ‘७ पीएम-मित्र मेगा टेक्सटाईल पार्क’पैकी एक असलेल्या अमरावतीतील महा वस्त्रोद्योग उद्यानाचा १६ जुलै रोजी मुंबईत शुभारंभ झाला. सुमारे १ हजार २० एकर क्षेत्रात हे महा वस्त्रोद्योग उद्यान विकसित केलं जाणार असून चार उद्योगांबरोबर सामंजस्य करारांची देवाण-घेवाण देखील करण्यात आली आहे. याबद्दल नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
हे ही वाचा >> “सरकारला निजामाचे पुरावे चालतात, पण छत्रपतींचे नाही”, काँग्रेसच्या टीकेला अजित पवारांचं उत्तर, म्हणाले…
दरम्यान, या दहीहंडी कार्यक्रमावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्याबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. देवेंद्र फडणवीसांनी नवनीत राणांना काळजी करू नये, असं म्हणत पूर्ण पाठिंबा दिला आहे. फडणवीस म्हणाले, “मी अगदी दाव्याने सांगतो की, अमरावती जिल्ह्याला मोदी सरकारने आणि आमच्या सरकारने जे दिलंय ते गेल्या ७० वर्षात कोणाकडूनही मिळालेलं नाही. मी नवनीत राणांना या निमित्ताने सांगू इच्छितो की, त्यांनी काळजी करू नये. लोकांचं नवनीत राणांवर खूप प्रेम आहे. त्या मोदींसाठी काम करत आहेत. आपल्या देशात मोदींना साथ देईल त्याला लोक निवडून देतील. म्हणून आमचं सरकारही पूर्णपणे त्यांच्या पाठिशी उभं आहे.”