नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नवनीत राणा यांनी माध्यमांसमोर येणं टाळलं होतं. अखेर त्या गुरुवारी (१३ जून) प्रसारमाध्यमांना सामोऱ्या गेल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी दिल्लीला गेलेल्या नवनीत राणा या नुकत्याच महाराष्ट्रात परतल्या. नागपूर विमानतळावर त्यांनी माध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्या म्हणाल्या, मी पाच वर्षे अमरावतीकरांसाठी खूप कामं केली, तरीदेखील त्यांनी मला लोकांनी का थांबवलं? याचा विचार मी करत आहे. मी माझ्या मतदारसंघात आणि जिल्ह्यात केलेल्या कामांमुळे २०१९ मध्ये अमरावतीकरांनी मला अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभेत पाठवलं होतं. निवडून आल्यानंतर मी आणखी कामं केली. परंतु, यंदा मला त्यांनी का थांबवलं? हे मी समजू शकले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवनीत राणा म्हणाल्या, “मी पराभूत होऊनही जिंकले आहे. कारण आमच्या नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. मी नक्कीच हरले आहे. परंतु, नरेंद्र मोदी जेव्हा शपथ घेत होते, तेव्हा माझ्या मनात जिंकल्याचीच भावनात येत होती.”

दरम्यान, नवनीत राणा यांना यावेळी विचारण्यात आलं की तुम्ही आता राज्यसभेवर जाणार आहात की महाराष्ट्रात काम करणार? यावर त्या म्हणाल्या, “मी माझ्या मतदारसंघात, माझ्या लोकांसाठी काम केलं. त्यामुळेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमरावतीकरांनी मला अपक्ष उमेदवार म्हणून निवडून संसदेत पाठवलं. त्यानंतर खासदार झाल्यानंतर मी अजून कामं केली. परंतु, मला कळत नाही की माझ्या जनतेने मला का थांबवलं? मी सध्या भविष्याचा विचार करत नाही. मी एक कार्यकर्ती म्हणून आमच्या जिल्ह्यात, माझ्या मतदारसंघात काम करत राहीन. आमच्या नेत्यांबरोबर बोलून पुढची वाटचाल कशी करायची याची तयारी करेन.”

हे ही वाचा >> “मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत

नवनीत राणांच्या पराभवाला भाजपा जबाबदार असल्याची चर्चा मतदारसंघात होत आहे. यावरून राणा यांना प्रश्न विचारण्यात आला की, लोकसभा निवडणुकीत तुम्हाला जनतेने, कार्यकर्त्यांनी की महायुतीच्या नेत्यांनी थांबवलं? यावर नवनीत राणा म्हणाल्या, “मी २०१९ पासून आतापर्यंत खूप इमानदारीने जनतेसाठी काम केलं आहे. पक्षाची एक कार्यकर्ती म्हणून जी कामं करायला हवी होती ती सगळी कामं केली. आम्ही खूप लढलो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने मार्गक्रमण करत राहिलो. शिवाजी महाराजांचं एक वाक्य आहे की लढणारा कधीच मागे वळून पाहत नाही, त्याप्रमाणे मी देखील आता मागे वळून पाहणार नाही. पुढेच चालत राहीन.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navneet rana says not thinking of rajya sabha will work in constituency after defeat in lok sabha election 2024 asc