Navneet Rana : बांगलादेशातील हिंदूंचं रक्षण पंतप्रधान नरेंद्र मोदी का करु शकत नाहीत? असा सवालल आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विचारला होता. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी भाजपावर, नरेंद्र मोदींवर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन टीका केली. त्यावर आता भाजपाच्या नेत्या नवनीत राणा ( Navneet Rana ) यांनी जोरदार टीका केली आहे. जनाब उद्धव ठाकरे असा उल्लेख त्यांनी केला आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना हनुमान चालीसा आंदोलनाची आठवणही करुन दिली.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. इस्कॉनचं मंदिर जाळण्यात आलं. त्यांच्या प्रमुखांना अटक झाली तरीही गप्प आहोत. हिंदूंवर अत्याचार होऊनही गप्प आहोत. माझी तमाम हिंदूंतर्फे पंतप्रधान मोदींना विनंती आहे की जसं आपण एका फोनवर युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं तसंच बांगलादेशात जे काही हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्याबद्दल भूमिका घ्यायला पाहिजे. नुसतं इथे बटेंगे, कटेंगे, फटेंगे वगैरे करुन उपयोग नाही. जिथे काही नाही तिथे छाती फुगवून दाखवू नका. जिथे अत्याचार होत आहेत त्यांना धमक दाखवण्याची गरज आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.
देवेंद्र फडणवीस यांनाही केला सवाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजवटीत हनुमानाचं मंदिर पाडलं जाण्याची नोटीस येते आहे. सिडकोतल्या मंदिरावर कुणाचा तरी डोळा आहे. हल्ली कुणाला सगळं मिळतं तुम्हाला माहित आहेच. बांगलादेशात मंदिर जाळलं जातं आहे. हिंदूंवर बांगलादेशात अत्याचार होत आहेत तरीही जे हिंदुत्व हिंदुत्व करतात त्या भाजपाची हिंदुत्वाची व्याख्या आणि आकारऊकार तरी काय? हे मला उत्तर मिळालं पाहिजे. निवडणुकीपुरतं फक्त हिंदुत्व भाजपाकडे उरलं आहे का? हिंदू म्हणजे फक्त मतं नाहीत. त्यांना भावना आहेत. आधी हिंदूंना घाबरवायचं आणि मग त्यांची मंदिरंही सेफ नाहीत असं जर असेल तर काय बोलायचं असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.
हे पण वाचा- Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य; “युक्रेनचं युद्ध मोदींनी जसं एका फोनवर थांबवलं तसं बांगलादेशात…
नवनीत राणा काय म्हणाल्या?
नवनीत राणा ( Navneet Rana ) म्हणाल्या की, “जनाब उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तेव्हा मी हनुमान चालीसा पठण करणार म्हणून मला १४ दिवस जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. माझ्यावर आणि रवी राणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हा उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व कुठे गेलं होतं? आज ते देशाच्या पंतप्रधानांवर बोलत आहेत. जनाब उद्धव ठाकरे तुमची लायकी नाही, देशाच्या पंतप्रधानांवर बोलायची” असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
देशातील पंतप्रधानांना हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही
नवनीत राणा ( Navneet Rana ) पुढे म्हणाल्या की, “बांगलादेशवर जे अत्याचार होत आहे. यावर संपूर्ण महाराष्ट्रात हिंदू समाजाने मोर्चे काढले, निषेध व्यक्त केला. तेव्हा जनाब उद्धव ठाकरे कुठे होते? तेव्हा हिंदुत्व आठवलं नाही. आज टीका करण्यासाठी आणि टोमणे मारण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. तुम्ही देशातील पंतप्रधानांना हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. एका लोकप्रतिनिधीला १४ दिवस जेलमध्ये टाकले, तेव्हा हिंदुत्व कुठे गेलं होतं? असा सवाल देखील नवनीत राणा ( Navneet Rana ) यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरेंनी आता फक्त आराम करावा-राणा
नवनीत राणा पुढे म्हणाल्या, “उद्धव ठाकरे तुम्ही काळजी करू नका. हिंदूंसाठी आमच्यासारखे हिंदू भक्त या मैदानात आहेत. तुम्ही फक्त आराम करा, तुम्हाला आराम करण्यासाठीच आम्ही सोडले आहे, असा टोला देखील नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. आज फक्त टोमणे द्यायचे, विरोध करायचा म्हणून आज तुम्हाला आठवलं. विधानसभा निवडणुकीत त्यांना जनतेने उत्तर दिलं आहे”, असंही नवनीत राणा ( Navneet Rana ) यांनी म्हटलं आहे.