सुखकर्त्यां गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला अन् इकडे करवीर नगरीत शारदीय नवरात्रोत्सवाच्या तयारीच्या मुद्दय़ावरून नवनवी विघ्ने उभी राहिली. प्रसाद लाडूचा द्यायचा की खडीसाखर-फुटाणेचा, प्रसाद महिलांना बनवायला अनुमती द्यायची का, दहशतवादी घडामोंडीच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेचे काय करायचे, भाविकांना दर्शन सुलभ घेता यावे म्हणजे नेमके काय करावे.. यांसारख्या अनेक समस्यांनी डोके वर काढले. यावर बैठकांवर बैठकांचे सत्र होऊन नियोजनाचा कृती आराखडा बनविण्यात आला. यामुळे उद्या मंगळवारपासून सुरू होणारा शारदीय नवरात्रोत्सव सुरळीत पार पडेल, अशी अपेक्षा आहे.
  दक्षिण काशी कोल्हापुरातील श्री महालक्ष्मीचे मंदिर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ म्हणून ओळखले जाते. स्वाभाविकच देवीच्या दर्शनासाठी दररोज ८-१० हजार भाविकांची गर्दी असते. नवरात्र हा तर खास देवीचा सण असल्याने या पावनकाळात देवीचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची रोजची संख्या लाखांवर जाते. इतक्या प्रचंड संख्येने भाविक येणार म्हटल्यावर महालक्ष्मी मंदिराचे अंतरबाह्य़ नियोजन, सुरक्षा या गोष्टींकडे डोळ्यात तेल घालून दक्ष राहण्यावाचून पर्याय नसतो. हे वास्तव माहीत असतानाही नवरात्रोत्सवाच्या आधी काही दिवस अगोदर अनेक विविध समस्या उग्र बनल्याने उत्सव कसा पार पडणार यावर प्रश्नचिन्ह लागले. भाविकांना महालक्ष्मीच्या दर्शनानंतर ओढ असते ती प्रसादाची. मात्र नेमक्या या मुद्दय़ावरून संघर्ष उफाळला होता. परंपरेप्रमाणे खडीसाखर-फुटाणे हा प्रसाद देण्याचा मुद्दा मागे पडून लाडू प्रसाद द्यावा, यावर एकमत झाले. मात्र लाडू प्रसादाचे आर्थिक हितसंबंध गुंतलेल्या मनसेच्या स्थानिक नेत्यांनी महिलांच्या मासिक धर्माचा मुद्दा उपस्थित करून धर्मयुध्दच छेडले. त्यावर चर्चेचे गुऱ्हाळ रंगून अखेर गौराई महिला बचतगटाला लाडू प्रसादाचा ठेका देण्याचा निर्णय झाल्याने देवीच्या उत्सवकाळात नारी शक्तीचा विजय होऊन एक विघ्न दूर झाले.  शारदीय नवरात्रोत्सव यथासांग पार पडण्यासाठी उपोरक्त सारे निर्णय भाविकांच्या दृष्टीने स्वागतार्ह ठरले आहेत.
 याचवेळी लाखोंच्या संख्येने गर्दी करणाऱ्या भाविकांनी आपले कर्तव्यही तितक्याच जबाबदारीने पार पाडले पाहिजे. दर्शनानंतर देवीसमोर रेंगाळणे, गर्दीत रेटारेटी करणे, खणनारळाने ओटी भरण्याची मूळ परंपरा सुरू ठेवणे, देवी अंगात येणे यांसारख्या घटनांबाबत प्रथेबरोबरच वास्तवाचे तारतम्यही भाविकांनी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. नवरात्रोत्सवाचे नियोजन करताना महालक्ष्मी मंदिरात कळसुबाई मंदिराप्रमाणे दुर्घटना घडू नयेत याची काळजी घ्यावी असा पुढे आलेला मुद्दा योग्यच आहे. गर्दी झाल्यामुळे सुरक्षेला गालबोट लागता कामा नये ही सामान्य भाविकांची अपेक्षा रास्तच आहे. देशातील वाढत्या दहशतवादी घटनांच्या पाश्र्वभूमीवर मंदिरासह संपूर्ण शहराच्या सुरक्षेकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे.     
सुरक्षा नियोजन
* मंदिरात सीसी टिव्ही बसविणार
* मोबाईल जामर कार्यान्वित करणार
* मंदिराजवळील वाहनतळ हलविणार
* दर्शनासाठी भाविकांच्या दोन रांगा
* रांगेतच पिण्याच्या पाण्याची सोय
* भाविकांसाठी माहिती फलक
* पोलीस व सुरक्षारक्षक वाढविणार
* व्हीआयपी दर्शनावर बंधन
* उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मॅट, पंखे व मंडपाची उंची वाढविणार