पंढरपूर : येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला. रुक्मिणीमातेला पुढील नऊ दिवस शिवकालीन, पेशवेकालीन अलंकार,खडा व बैठकीचे पोशाख करण्यात येणार आहेत. याच बरोबरीने नऊ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी, प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे.
दरम्यान, पहिल्या माळेला शहरात पावसाने हजेरी लावली आहे. करोनानंतर म्हणजेच दोन वर्षांनंतर कोणतेही निर्बंधाशिवाय नवरात्र उत्सवास प्रारंभ झाला आहे. येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात या शारदीय नवरात्र उत्साहानिमित्त रुक्मिणीमातेला शिवकालीन,पेशवेकालीन दागिने,अलंकाराने सजविण्यात येणार आहे. रुक्मिणीमातेला दररोज २५ ते ३२ विविध अलंकारांनी सजविण्यात येणार आहे. या मध्ये ठुशी, जवेची माळ,मोहरांची माळ, कंठी (मोत्याचा) तानवड( कर्णफुले) आदी अलंकाराने देवीला सजविण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे खडा व बैठकीचे पोशाख करण्यात येणार आहेत. या मध्ये मारवाडी /वंजारी/लमाणी, तुळजाभवानी , सरस्वती, वनदेवी (फुलांचा पोशाख), कमला देवी (कमळात बसलेली), कोल्हापूरची महालक्ष्मी , दुर्गा देवी, पसरती बैठक आणि सोन्याची साडी असे पोशाख केले जाणार आहेत.
नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी पुण्यातील भक्त राम जांभूळकर यांनी विविध आकर्षक फुलांनी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे मंदिर सजविले आहे. याच बरोबरीने मंदिर समितीच्या वतीने आजपासून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मंजुषा पाटील यांचे शास्त्रीय गायन, अपर्णा केळकर व संजय गरुड यांचे अभंगवाणी यासह आनंद माडगूळकर, डॉ. राधा मंगेशकर, मनीषा निश्चल व जितेंद्र अभ्यंकर यांचा ‘गदिमा बाबूजी आणि मंगेशकर’ असे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हे सर्व कार्यक्रम संत तुकाराम भवन येथे रोज सायंकाळी ७.३० ते १० पर्यंत होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पूदलवाड यांनी दिली आहे.