आकर्षक रोषणाई, अखंड तेवत राहणारा नंदादीप आणि ‘उदे ग अंबे उदे’चा गजर.. अशा भक्तिमय वातावरणात शनिवारी उत्तर महाराष्ट्रात नवरात्रोत्सवास उत्साहात सुरुवात झाली. सप्तशृंगी गडावर शारदीय नवरात्रोत्सव आणि नाशिकचे ग्रामदैवत असणाऱ्या कालिका देवीच्या यात्रेच्या पाश्र्वभूमीवर, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी उपरोक्त मंदिरांसह भगूरची रेणुका देवी, धुळे जिल्ह्य़ातील बिजासनी देवी व एकविरा माता, म्हसदीची धनदाई मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाल्याचे पाहावयास मिळाले.
सार्वजनिक मंडळांसह घरोघरी मंगलमय वातावरणात घटस्थापना करण्यात आली. यंदा अकरा दिवस नवरात्रोत्सव असून गरबा व टिपरी नृत्य चौकाचौकांत बहरणार आहे. विविध देवी मंदिरांमध्ये विधिवत व उत्साहात घटस्थापना करण्यात आली. उत्तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री सप्तशृंगी देवीच्या गडावर शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. पहाटे मान्यवरांच्या हस्ते सप्तशृंगी देवीची आरती करण्यात आली. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन गडावर या काळात जवळपास ५०० अधिकारी-कर्मचारी बंदोबस्ताची धुरा सांभाळत आहेत. गर्दीवर नजर ठेवण्यासाठी सीसी टीव्ही कॅमेरे, सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणेची व्यवस्था, भाविकांच्या वाहतुकीसाठी २८० जादा बसेस, वैद्यकीय सेवा आदींचे नियोजन करण्यात आले आहे. सप्तशृंगी गडाप्रमाणे नाशिक येथील कालिका देवी मंदिरही आकर्षक रोषणाईने उजळून निघाले आहे. महापौर अशोक मुर्तडक यांनी सपत्नीक महापूजा केली. ग्रामदेवतेच्या दर्शनासाठी भाविकांची मध्यरात्रीपासून रीघ लागली. या काळात परिसरात यात्रा भरत असल्याने जुना मुंबई-आग्रा महामार्ग दुपारनंतर वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. नाशिक शहरात १२३ बडय़ा, तर ३२५ छोटय़ा मंडळांनी दुर्गामाता मूर्ती व घटस्थापना केली आहे. अनेक मंडळांनी टिपरी व गरबा नृत्य आदी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मनमाड-येवला राज्य मार्गावरील अणकाई येथील पुरातन लेण्याजवळील गिरजामाता देवी नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. उत्तर महाराष्ट्रातील अनेक देवी मंदिरात यानिमित्त देवीचे पाठ, महाआरती, होमहवन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.