मालवण : भारतीय नौदलातर्फे ४ डिसेंबर रोजी साजरा होणारा ‘नौदल दिन’ यंदा प्रथमच कोकणच्या किनारपट्टीवरील शिवकालीन आरमाराची आद्य वास्तू असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या सान्निध्यात मालवण-तारकर्ली येथे आयोजित करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या ऐतिहासिक सोहळय़ात भारतीय नौदलाच्या युद्धनौका, लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि साहसवीर नौसैनिकांनी चित्तथरारक कसरती व प्रात्यक्षिके सादर केली.
हेही वाचा >>> नौदलातील हुद्यांचे भारतीयीकरण, पंतप्रधानांची घोषणा; सिंधुदुर्गमध्ये शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
सिंधुदुर्ग चिपी विमानतळावरून पंतप्रधान मोदी यांचे मालवणच्या टोपीवाला बोर्डिग मैदानावर दुपारी आगमन झाले. त्यानंतर प्रथम राजकोट किल्ला येथे छत्रपती शिवाजीमहाराजांच्या ४३ फुटी पूर्णाकृती पुतळय़ाचे मोदी यांनी अनावरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, आरमार आणि अन्य महत्त्वाचे प्रसंग चितारलेल्या प्रदर्शनालाही पंतप्रधानांसह मान्यवरांनी भेट दिली. राजकोट ते तारकर्ली हे अंतर आठ किलोमीटर आहे. हा प्रवास पंतप्रधानांनी नरेंद्र मोदी मोटारीने केला. तारकर्ली येथील किनाऱ्यावर नौदलाचा मुख्य कार्यक्रम झाला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, नौदलप्रमुख अॅडमिरल हरीकुमार इत्यादी या सोहळय़ाला उपस्थित होते. नौदलाच्या युद्धनौका, हेलिकॉप्टर, लढाऊ विमाने, छत्रीधारी नौसैनिक इत्यादींनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली.