सावंतवाडी : मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम नौदलाचा होता. मग झालेला साडेपाच कोटींचा खर्च जिल्हा नियोजनमधून का करण्यात आला? असा सवाल आज कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला. या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला असून त्या ठिकाणी मिळालेले पैसे लोकसभा निवडणुकीत मतदारांना वाटण्यात आले, असा आरोप नाईक यांनी केला. दरम्यान उच्च न्यायालयात संबंधित प्रकरणी दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यावेळी नाईक म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर अनेक गोष्टी आता उघड होऊ लागल्या आहेत. खरेतर मूर्तीकार आपटे यांना २६ लाख रुपये आतापर्यंत पोहोच झाले आहेत. अशी माहिती पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाल्यानंतर या पुतळ्याच्या कामामध्येसुद्धा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे. पोलीस तपासही गुपचूप झाला. पोलीस तपासात काय निष्पन्न झाले हे सामान्य जनतेला कळाले पाहिजे म्हणून माहिती जाहीर करणे आवश्यक होते. पण तसे झाले नाही.

हेही वाचा – ‘लाडकी बहीण’वरून महायुतीत कोणताही वाद नाही- सुरेश खाडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या राजकोट येथील पुतळा अनावरण आणि नौसेना दिनाच्या कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजनमधून ५ कोटी ५४ लाख रुपये खर्च झाले आहेत. त्यामध्ये हेलिकॉप्टर इंधन, डीव्ही कार, शासकीय वाहने यांचे इंधन यासाठी ३७ लाख ९० हजार, मान्यवर निवास व्यवस्था आणि भोजन व्यवस्था २५ लाख ५० हजार, मंडप २ कोटी, बॅरिकेटिंग दीड कोटी, इंटरनेट, पाणीपुरवठा, ओळखपत्र छपाई यासाठी १८ लाख ५० हजार आणि जिल्ह्याबाहेरून येणारे पोलीस, अधिकारी, कर्मचारी यांचे निवास आणि भोजन यासाठी १ कोटी २२ लाख ४५ हजार असे एकूण ५ कोटी ५४ लाख ३५ हजार रुपये जिल्हा नियोजन मधून खर्च झल्याचा तपशील आमदार वैभव नाईक यांनी यावेळी सादर केला.

यावेळी नाईक पुढे म्हणाले, आमच्या माहिती प्रमाणे हे पैसे जिल्हा नियोजन आणि नौदल या दोघांकडूनही खर्च झाले आहेत. कारण नौसेना कोणत्याच विषयावर काहीच बोलत नाही. पुतळा प्रकरणात नौसेना गप्प आहे. २६ लाख रुपये शिल्पकार जयदीप आपटे याला मिळाल्याचा आमचा आरोप आहे. त्यावरसुद्धा नौसेना काहीच बोलत नाही. त्यामुळे नौसेना कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजनमधून पैसे खर्च करण्यात आले आहेत आणि हे पैसे नौसेनेसुद्धा खर्च केले आहेत. मग एकाच कामावर दोघांकडून खर्च कसा? असा सवाल वैभव नाईक यांनी उपस्थित करत यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. या भ्रष्टाचारातून, पुतळा उभारणीतून, रेल्वे स्टेशन सुशोभीकरण या कामात आलेले पैसे नारायण राणेंच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांना वाटले गेल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे. आम्ही विरोधक म्हणून आरोप करत नाही. तर ही वस्तुस्थिती आहे. आमच्याकडे पुरावे आहेत म्हणून आरोप करत आहोत. आम्ही आरोप केल्यावर त्यावर पालकमंत्री आणि सत्ताधाऱ्यांनी ब्र सुद्धा काढलेला नाही.

हेही वाचा – Satyapal Malik: विधानसभेत भाजपाचा सुपडा साफ होणार; उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर भाजपाच्या माजी नेत्याची घणाघाती टीका

जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे पैसे खर्च केले याबबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत असून त्याची प्रक्रिया सुरु आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार आहे. तसेच हे अधिकारी, पालकमंत्री यांनी अंदाधुंद कारभार केला आहे. त्याचा पर्दाफाश लवकरच होईल, असे नाईक यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navy program at malvan why was five and a half crores spent from sindhudurg district planning allegation of mla vaibhav naik ssb