सातारा : मुंबई येथील भारतीय नौदलाच्या ब्रह्मपुत्र करंजा उरण या तळावर नेमणुकीस असलेले रडार प्लॉटर मदन दत्ताजी जाधव (कण्हेरखेड, ता. कोरेगाव) यांना कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व मुलगी असा परिवार आहे.

कण्हेरखेड येथील शेतकरी कुटुंबाची त्यांना पार्श्वभूमी आहे. भारतीय नौदलामध्ये उत्कृष्ट सेवा बजावत असताना त्यांना पदोन्नती मिळत गेली. सध्या ते उरण येथे लीडिंग सिमॅन रडार प्लॉटर या पदावर कार्यरत होते. येत्या काही महिन्यांत ते निवृत्त होणार होते. मुंबई येथे कर्तव्य बजावत असताना त्यांना प्रकृतीचा त्रास जाणवू लागला. त्यांना तत्काळ कुलाबा येथील एका रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
त्यांना वीरमरण आल्याची माहिती समजताच कण्हेरखेडमध्ये शोककळा पसरली. जागोजागी श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले होते. मुंबई येथून पार्थिव दुपारी कण्हेरखेड येथे आल्यानंतर ते निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर सजवलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.

प्रशासनाच्या वतीने जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, पंचायत समितीच्या प्रशासक तथा गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, रहिमतपूरचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. सातारा जिल्हा पोलीस दलातर्फे बंदुकीच्या फैरी हवेत झाडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी अंत्यसंस्कार केले. भारतीय नौदलाचे उरण मुंबई येथील अधिकारी व जवान या वेळी उपस्थित होते.