अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी सचिन वाझे यांच्यासोबत मुंबई पोलिसांमधील इतरही काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सध्या चौकशी सुरू आहे. या प्रकरणी न्यायालयात देखील प्रकरण असताना आता त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी सूचक इशारा दिला आहे. नवाब मलिक यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि सचिन वाझेंच्या चौकशीसंदर्भात अजून एक धक्कादायक माहिती समोर येणार असल्याचा दावा केला आहे.

परमबीर सिंह-वाझेंनी मिळून कारस्थान केलं

नवाब मलिक यांनी परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अँटिलियाबाहेर स्फोटकं ठेवण्याचं कारस्थान परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांनी मिळून केल्याचं ते म्हणाले. “राजकीय हेतूने हे सर्व प्रकार झाले. अँटिलियाच्या बाहेर बॉम्ब ठेवण्याचं कारस्थान परमबीर सिंह आणि वाझेंनी मिळून केलं होतं. सरकारला त्या दोघांनी चुकीची माहिती दिली. हत्या केल्यानंतर देखील ते चुकीची माहिती देत होते. परमबीर सिंह यांची होमगार्डला बदली केल्यानंतर त्यांनी इमेलवर तक्रार केली. हा सगळा विषय राजकीय हेतूने प्रेरित होता. चांदीवाल आयोगाचा अहवाल आल्यानंतर सत्य परिस्थिती समोर येईल”, असं नवाब मलिक म्हणाले.

“तो’ पासपोर्ट वाझेंकडे सापडला!”

सचिन वाझेंनी एक बनावट पाकिस्तानी पासपोर्ट बनवल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला. “आणखीन एक धक्कादायक माहिती आज ना उद्या समोर येणार आहे. अँटिलिया प्रकरणात एका क्षुल्लक गुंडाच्या नावाने बनावट पासपोर्ट बनवण्यात आला होता. त्यावर पाकिस्तानचा एक्झिट-एंटर दाखवला गेला होता. वाझे आणि परमबीर सिंह यांनी तो तयार केला होता. मनसुख हिरेन शरण येण्यासाठी तयार झाला असता, तर त्याचा फेक एन्काउंटर करण्याचा प्लान परमबीर सिंह आणि वाझेचा होता. वाझेच्या घरून एनआयएला तो फेक पासपोर्ट मिळालेला आहे. एनआयएनं ही माहिती उघड करावी”, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

पश्चात्तापाच्या विधानावरून नवाब मलिकांचा फडणवीसांवर निशाणा; म्हणाले, “मला दिसतंय की…!”

“भविष्यात ईडीबाबत मोठा धमाका”

दरम्यान, ईडीबाबत देखील भविष्यात मोठा धमाका करणार असल्याचं नवाब मलिक म्हणाले. “ईडीच्या बाबतीत आमचा शोध सुरू आहे. भविष्यात त्याबाबत मोठा धमाका होणार आहे. केंद्र सरकार म्हणेल तसं विभाग चालतोय. राणेंना आलेल्या ईडीच्या नोटिशीचं काय झालं हे कुणाला माहितीच नाही. ईडीच्या माध्यमातून राणे भाजपामध्ये गेले. ईडीच्या माध्यमातून गुजरातमधील काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस सोडली. बंगालमध्ये टीएमसी सोडून भाजपात प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा घरवापसी झाली. ईडीच्या यंत्रणेचा गैरवापर होतच आहे”, असं नवाब मलिक म्हणाले.

Story img Loader