राज्यात एकीकडे राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण ढवळून निघालेलं असताना दुसरीकडे महाविकास आघाडीची हक्काची दोन मतं रद्द होणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. ही दोन मतं म्हणजे अर्थात सध्या तुरुंगात असलेले मंत्री नवाब मलिक आणि आमदार अनिल देशमुख. आज मतदान करण्यासाठी आधी या दोघांनी जामिनासाठी अर्ज केला होता. तो फेटाळण्यात आल्यानंतर पोलीस संरक्षणात मतदानासाठी जाण्याची परवानगी मागणारी याचिका त्यांनी केली होती. मात्र, त्यावर तातडीची सुनावणी घेण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे आता या दोघांच्या मतदानाची शक्यता धूसर झाली आहे.

सत्र न्यायालयाने एकदा मतदान करण्यास नकार दिलेला असताना पोलीस बंदोबस्तात मतदानासाठी नेण्याचा प्रश्न येतो कुठे ? असा प्रश्न करून उच्च न्यायालयाच्या आणखी एका एकलपीठाने नवाब मलिक यांच्या मतदानाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यामुळे देशमुख- मलिक यांच्या मतदानाची शक्यता आता धूसर झाली आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी आकडेमोडीचं राजकारण!

राज्यसभा निवडणुकीत सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. २८८ सदस्यांच्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये भाजपा १०६, शिवसेना ५५, काँग्रेस ४४, राष्ट्रवादी ५३ (यापैकी नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे दोन आमदार सध्या तुरुंगात आहेत) आणि अपक्ष व इतर छोट्या पक्षांचे मिळून २९ आमदार आहेत. प्रत्येक उमेदवाराला राज्यसभेवर जाण्यासाठी ४२ पसंतीच्या मतांची आवश्यकता आहे. सामान्यपणे या निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रघात असताना यंदा २४ वर्षांनंतर महाराष्ट्रात राजकीय सहमती न झाल्यामुळे निवडणूक होत आहे.

मविआच्या ३ आमदारांच्या मतदानावर भाजपाचा आक्षेप; मतं अवैध ठरवण्याची मागणी, निवडणूक अधिकारी म्हणाले…

दरम्यान, जिथे एकेका मताची जुळवाजुळव सुरू आहे, तिथे महाविकास आघाडीला नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या रुपाने दोन मतांचा फटका बसला आहे. भाजपाकडे देखील काही अतिरिक्त मतं असून इतर पक्ष आणि अपक्षांच्या पाठिंब्यावर तिसरा उमेदवार निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर एकेका आमदाराच्या मतालाही मोठं मूल्य प्राप्त झालं आहे.