Ajit Pawar On Sana Malik : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पुढच्या दोन महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे राज्यभर दौरे सुरु आहेत. राज्यातील विविध मतदारसंघात सभा, मेळावे, बैठका घेत नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीसाठी नेत्यांची चाचपणी सुरु असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या अनुषंगानेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्यभर दौरा करत आहेत. या दौऱ्याच्या माध्यमातून अजित पवार हे पक्षातील कार्यकर्त्यांच्या कामाचा आढावा घेत काही जणांवर नव्या जबाबदाऱ्या सोपवत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसंवाद यात्रा आज नवाब मलिक यांच्या मतदारसंघात पोहोचली. यावेळी अजित पवार यांच्या जनसंवाद यात्रेची नवाब मलिक यांनी जोरदार स्वागत केलं. आता काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास विरोध केला होता. याबाबत त्यांनी एक पत्रही लिहिलं होतं. मात्र, यानंतर आता नवाब मलिक आणि अजित पवार एका व्यासपीठावर पाहायला मिळाले आहेत. एवढंच नाही तर नवाब मलिक आणि अजित पवार यांनी आज एका गाडीमधून प्रवास केला.
हेही वाचा : जयंत पाटलांची अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका; म्हणाले, “रंगीबेरंगी कपडे…”
तसेच नवाब मलिक यांनी अजित पवार यांच्या जनसंवाद यात्रेच स्वागतही केलं. नवाब मलिक हे अजित पवारांबरोबरच असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून सुरु होत्या. त्या चर्चांवर पडदा पडण्याची शक्यता आहे. यातच आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. सना मलिक यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याबाबतची घोषणा अजित पवार यांनी केली. यावेळी अजित पवार म्हणाले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर मी जाहीर करतो की, सना मलिक या आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या असतील.”