दाऊदशी संबंधित सलीम पटेल आणि हसीना पारकर यांच्याशी गोवावाला कपाऊंडच्या जमिनीचा व्यवहार केल्याच्या आरोपांत नवाब मलिक यांना तुरुंगवास झाला होता. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला. हिवाळी अधिवेशनासाठी नवाब मलिक हे नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. वर्षभराहून जास्त काळ नवाब मलिक तुरुंगात होते. आज ते कुणाच्या गटात जाणार? हे पाहणं महत्त्वाचं होतं. आज ते अजित पवार गटाच्या अनिल पाटील यांच्या कार्यालयात जाऊन बसले. अनिल पाटील आणि धर्मराव बाबा अत्राम यांनी नवाब मलिक हे आमच्याच बाजूने आहेत असा विश्वास व्यक्त केला आहे. हा विश्वास सार्थ ठरवत नवाब मलिक हे सत्ताधारी बाकांवर जाऊन बसले आहेत.
अनिल पाटील काय म्हणाले?
“नवाब मलिक कुणाबरोबर आहेत याचा खुलासा नवाब मलिकच करतील. तसंच ते कुणाच्या बाजूने आहेत हे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सांगतील. नवाब मलिक सभागृहात जाऊन बसतील, त्यानंतर सगळं समजेलच. राष्ट्रवादीचा मुख्य प्रतोद या नात्याने मी २३ नोव्हेंबर रोजी अर्ज दिला होता. विधानमंडळात आम्हाला कार्यालय दिलं गेलं आहे. अध्यक्षांनी ते कार्यालय दिलं आहे.” असं अनिल पाटील म्हणाले. “आमच्यात गट-तट विषय नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचाच आहे. ” तसंच नवाब मलिक हे अनिल पाटील यांच्यासहच कार्यालयात बसलेले दिसून आले.
धर्मरावबाबा अत्राम काय म्हणाले?
“नवाब मलिक आमच्यासह बसतील सकाळी ११ वाजता. नवाब मलिक आमच्याबरोबर येणं सकारात्मक आहे. नवाब मलिक आमच्या बरोबर आहेतच. माझी त्यांची भेट झालेली नाही पण ते आमच्यासह आहेत.” असं कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी स्पष्ट केलं आहे.
नवाब मलिक यांच्यावर नेमके आरोप काय आहेत?
हसीना पारकर, सलीम पटेल, १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सरदार खान आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील मुनीरा प्लंबर या महिलेची तीन एकर जमीन कट रचून बेकायदेशीरपणे हडपल्याचा आरोप आहे. या महिलेने १९९९ मध्ये सलीम पटेलच्या नावाने पॉवर ऑफ अॅटर्नी जारी केली होती. याद्वारे सलीम पटेलकडून या जमिनीवर असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणाबाबत तोडगा काढणे अपेक्षित होते. मात्र, पटेलने याचा दुरुपयोग करत हसीना पारकरच्या सूचनेनुसार गोवावाला कंपाउंडमधील जमीन मलिक यांच्या सॉलिडस इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विकल्याचा आरोप आहे.
नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाउंडमधील जागा भाडे-तत्वावर देऊन त्यातून आलेल्या पैशांमधून वांद्रे, कुर्ला येथील फ्लॅट्स आणि उस्मानाबादमधील शेतजमीन खरेदी केली असल्याचा ईडीचा आरोप आहे. तर, नवाब मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावले होते.