दोन वर्षांपूर्वी अजित पवारांसोबत केलेल्या शपथविधीचा आपल्याला आता पश्चात्ताप होत असल्याची कबुली राज्याचे विद्यमान विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या मुद्द्यावरून राज्याच्या राजकीय वातावरणात संमिश्र प्रतिक्रिया उमटत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यावरून देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांच्या या विधानाचा समाचार घेताना, “चिडिया चुग गई खेत, अब पछताए का होय”, अशा शब्दांत प्रतिक्रिया देखील दिली आहे.
“फडणवीसांना सत्तेशिवाय राहताच येत नाही”
देवेंद्र फडणवीसांच्या विधानावरून नवाब मलिक यांनी निशाणा साधला आहे. “सत्तेशिवाय त्यांना राहाताच येत नाहीये. दोन वर्षांपूर्वी त्यांनी हे सिद्ध करून दाखवलंय. ते सांगत राहिले की अजून वाटत नाहीये की मी मुख्यमंत्री नाही. बहुतेक दोन वर्षांनंतर खरी परिस्धिती त्यांनी स्वीकारली आहे. त्यांचा सात वर्षांपूर्वीचा व्हिडीओ होता, ज्यात ते म्हणाले होते माझं लग्न कधीही होणार नाही, मी करणार नाही. पण हे ते विसरून गेले. म्हणजे सत्तेवर येण्यासाठी ते काहीही करू शकतात, काहीही बोलू शकतात”, असं नवाब मलिक म्हणाले.
फडणवीसांचं महत्त्व कमी होतंय?
भाजपामध्ये आता देवेंद्र फडणवीसांचं महत्त्व कमी होत असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली. “मला दिसतंय की आता देवेंद्र फडणवीसांची उंची कमी होऊ लागली (महत्त्व कमी होऊ लागलं) आहे. भाजपामधील त्यांचे अंतर्गत विरोधक असलेले विनोद तावडेंसारखे लोक मोठे होऊ लागले आहेत. त्यामुळे अंतर्गत राजकारण बदलतंय असं दिसतंय. ज्यांना तिकीट नाकारण्यात आलं, ते देशातले भाजपाचे महासचिव झाले. दोन-तीन महत्त्वाच्या राज्यांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. पंतप्रधानांकडे तावडेंना अॅक्सेस निर्माण झाला आहे”, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
फडणवीसांनी अजित पवारांसोबतच्या ‘त्या’ शपथविधीवर व्यक्त केला पश्चात्ताप; म्हणाले “हे नसतं झालं तर…”
काय म्हणाले फडणवीस?
oदेवेंद्र फडणवीसांनी आज महाविकासआघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भातलं विधान केलं आहे. “शिवसेनेने विश्वासघात केल्यानंतर जशास तसं उत्तर देण्यासाठी आम्ही अजित पवारांसोबत मिळून सरकार स्थापन केलं होतं. कारण आमच्या पाठीत खंजीर खुपसण्यात आला होता. आम्ही जशास तसं उत्तर देण्याचा विचार केला याचा मला पश्चात्ताप आहे. हे नसतं झालं तर चांगलं झालं असतं असंही सारखं वाटतं. मला माहिती आहे त्यावेळी काय झालं होतं आणि कोणी काय केलं होतं”, असं फडणवीस म्हणाले आहेत.