Nawab Malik on BJP Leaders Over Dawood Relations : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नवाब मलिक यांना मानखुर्द शिवाजी नगर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीला भाजपाने विरोध केलाय. त्यामुळे महायुतीतील वाद समोर आलाय. नवाब मलिकांच्या प्रचाराला जाणार नसल्याचं भाजपाने स्पष्ट केलंय. तसंच, नवाब मलिकांचे दाऊदशी संबंध असल्याचंही भाजपा नेते म्हणत आहेत. यावरून नवाब मलिकांनी भाजपाच्या नेत्यांना इशारा दिलाय. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

“दाऊदशी संबंध असल्याचे माझ्यावर जे आरोप करतात त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहे. गुन्हेगार, दहशतवादाचा कोणताही खटला माझ्यावर नाही. जे लोक माझ्यावर असे आरोप करत त्यांच्याविरोधात मी वरच्या न्यायालयात धाव घेणार आहे. मी बदनामीचा खटला टाकणार आहे. हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत”, असं नवाब मलिक म्हणाले.

हेही वाचा >> Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : पक्षनाव आणि चिन्हावरील मनसेच्या टीकेवर शिंदेंच्या आमदाराची प्रतिक्रिया, म्हणाले…

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांविरधात भूमिका घेतली आहे. तसंच, “दाऊद इब्राहिमशी संबंधित खटल्यातील व्यक्तीच्या प्रचारात आम्ही सहभागी होणार नाही”, असं भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले होते. भाजपाच्या या नेत्यांवर नवाब मलिकांनी टीका केली. ते म्हणाले, “कितीही मोठा नेता असला तरीही मी कायदेशीर कारवाई करणार आहे. माझ्या प्रचाराला या असा मी आग्रह करत नाही. जनतेचं पाठबळ माझ्या पाठीशी आहे. या आधारावर निवडणूक लढतो. दाऊदचं नाव माझ्याशी जोडणाऱ्यांवर कायदेशीर करणार आहे. मी माझ्या विचारधारेला कधीही सोडणार नाही.”

नवाब मलिकांबाबत भाजापाची भूमिका काय?

भाजपाचे आमदार व मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले, महायुतीमधील सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करायचे असं ठरलं होतं. विषय फक्त नवाब मलिकांच्या उमेदवारीचा होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) मलिक यांना मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. उपमुख्यमंत्री व आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांबाबत यापूर्वीच आमची भूमिका सांगितली आहे. मी देखील वारंवार भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे. आज पुन्हा एकदा सांगतो की अजित पवारांनी मलिकांना उमेदवारी दिली असली तर भाजपा त्यांचा प्रचार करणार नाही.

सना मलिकांबाबत भाजपाची वेगळी भूमिका

शेलार म्हणाले, भाजपाने मलिकांचा प्रचार करण्याचा प्रश्नच येत नाही. दाऊद इब्राहिमशी संबंधित खटल्यातील व्यक्तीच्या प्रचारात आम्ही सहभागी होणार नाही. दुसऱ्या बाजूला सना मलिक यांच्या प्रचाराबाबत प्रश्न विचारला जात आहे. सना मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) अणूशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ज्या प्रकरणात नवाब मलिकांना अटक झाली होती, त्या प्रकरणातील सना मलिकांच्या सहभागाबद्दलचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. असा कोणताही पुरावा मिळत नाही तोवर सना मलिक या राष्ट्रवादीच्या (अजित पवार) म्हणजेच महायुतीच्या आणि पर्यायाने भाजपाच्या उमेदवार असतील. आमचा त्यांना पाठिंबा आहे.