गेल्या साधारण वर्षभरापासून दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता यश आल्याचं दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली असून शेतकऱ्यांना आपलं आंदोलन मागे घेण्याचं आवाहनही केलं आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या घोषणेनंतर शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं असून शेतकऱ्यांनी मोदी सरकारला झुकवल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.
आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी या निर्णयाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “आदरणीय मोदीजींनी लोकांना संबोधित केलं, आपल्या कामांची माहिती दिली आणि घोषणा केली की तिन्ही कृषी कायदे मागे घेण्यात आले आहेत. आजपासून हे तिन्ही कायदे देशात राहणार नाहीत. सगळ्यात आधी मी सर्व शेतकरी बांधवांचं अभिनंदन करतो, जे गेल्या वर्षभरापासून आपल्या मागण्यांवर ठाम राहिले, कितीही प्रयत्न केले तरी ते मागे हटले नाहीत, त्यांच्यावर लाठीचार्ज केला, आतंकवादी असल्याचा आरोप केला पण तरीही त्यांनी सात वर्षात पहिल्यांदाच मोदी सरकारला झुकवण्याचं काम केलं. त्यांनी हे दाखवून दिलं की देश एकजूट असेल तर कुठलाही निर्णय बदलता येतो”.
हेही वाचा –
मलिक पुढे म्हणाले, “हीच गोष्ट आम्ही वारंवार सांगत होतो की सरकारला जसा कायदे करण्याचा अधिकार आहे तसंच कायदे मागे घेण्याचाही अधिकार आहे. आम्ही म्हणत होतो की नव्याने सुरुवात करुन चर्चा करायला हवी. पण जसंजश्या निवडणुका जवळ आल्या तसतसं हे स्पष्ट होऊ लागलं की भाजपा आता हरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हरण्याच्या भीतीने पंतप्रधानांनी तिन्ही कायद्यांना मागे घेतलं. मी सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो. तुमचा विजय हा देशाचा विजय आहे. या आंदोलनात जे शेतकरी शहीद झाले, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करत आहे. पुन्हा एकदा सांगतो, देशातला शेतकरी महान आहे. त्यांनी मोदीजींना झुकवलं”.