राज्यात सध्या नवाब मलिक हे नाव भलतंच चर्चेत आहे. एनसीबीनं २ ऑगस्टला मुंबईतल्या कॉर्टेलिया क्रूजवर छापा टाकून किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खानला अटक केली आणि तेव्हापासून नवाब मलिक चर्चेत आले. मलिक यांनी सातत्याने एनसीबी आणि विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. यादरम्यान, नवाब मलिक यांच्यावर भाजपाकडून देखील निशाणा साधण्यात आला आहे. या सर्व आरोप-प्रत्यारोपांमध्ये नवाब मलिकांचा उल्लेख भंगारवाला असा देखील करण्यात आला. त्यावर “भंगारवाला असल्याचा अभिमान आहे” असा प्रतिटोलाही नवाब मलिक यांनी लगावला. पण नेमका त्यांचा हा प्रवास आहे तरी कसा? कसे झाले नवाब मलिक एका भंगारवाल्यापासून थेट कॅबिनेट मंत्री?
नवाब मलिक मूळचे उत्तर प्रदेशचे!
कामानिमित्त मलिक कुटुंब मुंबईच्या डोंगरी भागात स्थायिक झालं आणि तिथलंच झालं. बुऱ्हाणी कॉलेजमध्ये असताना फीवाढीविरोधात आंदोलन केलं आणि त्यांच्या राजकीय प्रवेशाची सुरुवात झाली. १९८४ साली वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. गुरुदास कामत यांनी ही निवडणूक ९५ हजार मतांनी जिंकली. नवाब मलिक पराभूत झाले.
पण २६२० मतांनी पराभूत झालेले नवाब मलिक पुढे काँग्रेसमध्येच सक्रिय झाले. १९९१ मध्ये काँग्रेसनं महानगरपालिकेचं तिकीट नाकारल्यानंतर काही वर्षांनी ते समाजवादी पक्षात गेले. १९९५ साली कुर्ल्याच्या नेहरू नगर मतदारसंघात शिवसेनेच्या सूर्यकांत महाडिकांनी त्यांचा पराभव केला. पण पुढच्याच वर्षी झालेल्या पोटनिवडणुकीत ते जिंकले आणि विधानसभेत गेले. ९९ साली काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारसोबतच्या आघाडीत नवाब मलिक यांच्या वाट्याला गृहनिर्माण राज्यमंत्रीपद आलं.
जरीवाला चाळ पुनर्विकास गैरव्यवहार…
पुढे नवाब मलिक आणि समाजवादी पक्षातील काही नेत्यांमध्ये मतभेद सुरू झाले आणि त्यांनी मंत्रिपदावर असतानाच पक्षाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माहीमच्या जरीवाला चाळ पुनर्विकास गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर १२ वर्ष खटला चालला. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. सपा सोडल्यापासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रीय राहिलेल्या नवाब मलिक यांच्याकडे महाविकासआघाडी सरकारच्या काळात आता अल्पसंख्याक मंत्रीपद आहे.
गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक यांनी विरोधकांसोबतच एनसीबीविरोधातही आघाडी उघडली आहे!